Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Nashik › बस दरीत कोसळून चार भाविक ठार

बस दरीत कोसळून चार भाविक ठार

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 02 2018 11:45PMसुरगाणा/बोरगाव : वार्ताहर

हतगड-दळवट-कनाशी राज्य महामार्गावरील हतगडजवळील गायदर घाटात लक्झरी बस दरीत कोसळून गुजरात राज्यातील नवसारी येथील चार भाविक ठार झाले. तर, अन्य वीस भाविक जखमी झाले. जखमींना सापुतारा व बोरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, गुजरात राज्यातील नवसारी येथून हिल ट्रॅव्हल्सची बस (क्र.जीजे-05-एझेड-4850)  सप्तशृंगीगडाकडे जात असताना बुधवारी (दि.2) पहाटे तीन वाजेच्या सुमारास गायदरपाडा घाटाच्या धोकादायक  वळणावर गाडीचा ब्रेक फेल झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस तीस फुट दरीत कोसळून दोन महिला व दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये जेलीबीन मुकेशभाई पटेल (40), पलकुलबेन पटेल (30), जेनिलकुमार मुकेशभाई पटेल (4), तन्मय पंकज पटेल (7) यांचा समावेश आहे. तर, जखमींमध्ये निरुबेन पटेल, विशाखा पटेल, जयेश ओम पटेल, नरेश रामा पटेल, दयमंती पटेल, चंद्रकांत भैय्या, मयुरी पटेल, शमी पटेल, लक्ष्मी गोपाल पटेल, प्रतिभा दिनेश पटेल, शामा गणपत भैय्या, प्रियंका भारत, नन्साराम पटेल, लक्ष्मी पटेल, पंकज रावेर पटेल, प्रियंका अल्पेश पटेल, मयंत्री किशोर पटेल, कला महेश पटेल, ज्योती चिमना पटेल, बेनुबेन पटेल, तन्मय पंकज पटेल यांना बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रुग्णांवर डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. गवळी, डॉ. खंडू भोये यांनी तत्काळ उपचार सुरु केले. दवाखान्यात जागा अपुरी पडत असल्याने रुग्णांना सापुतारा येथे हलविण्यात आले. तन्मय पंकज पटेल याचे दोन्ही पाय बसच्या कॅबिनमध्ये अडकल्याने तन्मय ओरडत होता. त्यावेळी हतगडचे पोलीस पाटील गणेश जाधव, सोमनाथ कवर, एकनाथ कवर, रमेश बागुल, अशोक गवळी, लक्ष्मण बागुल, भास्कर भोये,  कळवनचे पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, सुरगाण्याचे पोलीस मच्छिंद्र दिवे, हतगड व गायदरपाडा ग्रामस्थांनी आठ तासांच्या प्रयत्नातून तन्मयला बाहेर काढले. परंतु, उपचारादरम्यान तन्मयचा मृत्यू झाला.