Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Nashik › कीर्तांगळी  शिवारात बिबट्याचे बछडे

कीर्तांगळी  शिवारात बिबट्याचे बछडे

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:03AMसिन्‍नर : प्रतिनिधी

सिन्‍नर तालुक्याच्या विविध भागांत बिबट्याचे दर्शन, मोटारसायकलस्वारांवर हल्ला अशा घटना घडत असताना बुधवारी (दि.11) सकाळी 11.30 च्या सुमारास कीर्तांगळी शिवारात बिबट्याचे चार बछडे आढळून आले असून, वनविभागाने त्यांना तातडीने नैसर्गिक अधिवासात सोडले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कीर्तांगळी शिवारात कडवा पाटचारीलगत दशरथ पुरी यांचे उसाचे शेत आहे. सध्या तोडणी कामगारांमार्फत ऊसतोडणीचे काम सुरू असताना सकाळी 11.30 च्या सुमारास बिबट्याचे चार बछडे आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच परिसरातील शेतकर्‍यांसह नागरिकांनी बछडे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी गर्दी केली. 

वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल साळवे, वनमजूर मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

त्याच भागात बछड्यांच्या आईचा वावर असल्याची खात्री देत वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांना सतर्क केले. प्रत्यक्षदर्शींकडून चार बछड्यांचे दर्शन झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र वनकर्मचार्‍यांना दोनच बछडे आढळून आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बछड्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बोडके, वनपाल साळवे यांनी दिली.