Tue, Mar 19, 2019 15:31होमपेज › Nashik › योगाचे व्यापारीकरण थोपविणे गरजेचे 

योगाचे व्यापारीकरण थोपविणे गरजेचे 

Published On: Jun 22 2018 2:06AM | Last Updated: Jun 21 2018 11:26PMनाशिक : गौरव जोशी

केंद्र सरकारने योगाला राजाश्रय दिला आहे. त्यासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालय सुरू केले आहे. यामध्ये ए म्हणजे आयुर्वेद, वाय म्हणजे योगाथेरपी, यु म्हणजे युनानी, एस म्हणचे सिद्ध तसेच एच म्हणचे होमिओपॅथी आहे. परंतु, आजच्या घडीला योगाची कॉर्पोरेट इंडस्ट्री उभी राहिली असून, जो उठतो तो योग शिकवितो. त्यामुळेच योगथेरपी धोक्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने शिक्षण दिल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर होण्याची भीती आहे. त्यामुळेच या व्यापारीकरणावर कुठे तरी लगाम घालण्याची गरज आहे, अशी अपेक्षा नाशिकमधील योगाचार्य तथा योगविद्या धामचे संस्थापक विश्‍वास मंडलिक यांनी व्यक्‍त केली.

जागतिक स्तरावर गुरुवारी (दि.21) योग दिन उत्साहात साजरा केला जात असताना योगविद्या धामचे संस्थापक विश्‍वास मंडलिक यांना योगविद्येच्या प्रचार-प्रसारातील भरीव योगदानाबद्दल पंतप्रधान पुरस्कार जाहीर झाला आहे. मानचिन्ह, मानपत्र आणि पंचवीस लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मंडलिक यांनी पुरस्काराची घोषणा झाल्याबद्दल दै. ‘पुढारी’शी दिलखुलास संवाद साधला.

महाराष्ट्र सरकार योगसाधनेसाठी एक कायदा तयार करत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात त्याबाबतचे विधेयक ठेवण्यात येणार आहे. या कायद्याला मान्यता मिळाल्यानंतर योगसाधना व योगोपचार करण्यावर बंधने येतील. यामुळे या क्षेत्रात चाललेल्या बेबंदशाहीला खर्‍या अर्थाने लगाम बसेल अशी आशा मंडलिक यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांच्याशी झालेली प्रश्‍नोत्तरे:

जगभरात योगाचा प्रचार-प्रसार वाढतो आहे, त्याबद्दल समाधानी आहात का?

व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास साधण्याचे कार्य योगसाधना करते. गेल्या चार वर्षापासून साजरा केल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय योगादिनामुळे या साधनेकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. योगाचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

तरुणाई योगाकडे वळते आहे, याबद्दल काय वाटते?

अगदी अलीकडेपर्यंत वयोवृद्धांचाच योगाकडे येण्याचा कल होता. परंतु, आहार-विहार, आचार आणि विचार यांची सांगड घालणार्‍या योगामुळे निरोगी व सुदृढ आयुष्य लाभते. वैद्यकीय क्षेत्रालादेखील योगाचे महत्व पटले आहे. जागतिक योग दिनाच्या आयोजनामुळे नागरिक योगाकडे वळत आहे. विशेषत: त्यात तरूणाईचा कल अधिक आहे. सुदृढ आणि निरोगी युवक हा उद्याचे देशाचे भविष्य आहे. मात्र, योगाला राजाश्रय मिळत असतानाच त्यात व्यापारीकरण होऊ लागले आहे. ते योगासाठी घातक आहे. 

योगाचे व्यापारीकरण म्हणजे नक्की काय?

केंद्र सरकारने योगाला राजाश्रय दिला आहे. त्यासाठी स्वतंत्र्य आयुष मंत्रालय सुरू केले आहे. यामध्ये ए म्हणजे आयुर्वेद, वाय म्हणजे योगाथेरपी, यु म्हणजे युनानी, एस म्हणचे सिद्ध तसेच एच म्हणचे होमिओपॅथी आहे. परंतु, आजच्या घडीला योगाची कॉर्पोरेट इंडस्ट्री उभी राहिली असून जो उठतो तो योग शिकवितो. त्यामुळेच योगथेरपी धोक्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने शिक्षण दिल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर होण्याची भीती आहे. त्यामुळेच या व्यापारीकरणावर कुठे तरी लगाम घालण्याची गरज आहे.  

तुम्ही योगसाधना क्षेत्रात कसे आलात?

वयाच्या 17-18 व्या वर्षी पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना मे महिन्याच्या सुट्यांमध्ये नूतन मराठा विद्यामंदिरात योगाचे 1 महिन्याचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून योगाची साधना अखंडित सुरू आहे. हीच साधना योग विद्या धामच्या उभारणीत महत्वाचा दुवा ठरली. 

योगविद्या धामची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली?

माझे शिक्षण इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगपर्यंत झाले आहे. नाशिक, मुंबई, पुण्यात तीन उद्योग होते. मात्र, वयाच्या 50 व्या वर्षी हे सर्व सोडून देत योगसाधनेतच आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिकमध्ये 1978 साली एचपीटी महाविद्यालयासमोर योग विद्या धाम सुरू केले. 

योग्य विद्या धामचा आज वटवृक्ष झाला आहे...

हो नक्कीच. 1978 साली 2 विद्यार्थ्यांना घेऊन योग प्रशिक्षणाला नाशिकमध्ये प्रारंभ केला. 1983 साली राज्यभरात योगविद्या धामचे कार्य पोहचले. त्यावर्षी राज्यातील 32 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात शिक्षक म्हणून नेमले. आजमितीस राज्यात धामच्या 150 शाखा आहेत. त्र्यंबकेश्‍वर रोडवरील 25 एकर जागेतील केंद्र 2002 पासून सुरू झाले. योग विद्या धामने देशाभरात आजपर्यंत 15,000 शिक्षक घडविले आहेत. एकट्या आसाममध्ये दीड हजार शिक्षक आहेत. जगातील 115 देशात कार्य पोहचले असून पाच शिक्षक तेथे योगाचे धडे देत आहेत. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्‍वर रोडवरील केंद्रात इंग्रजीमधून अभ्यासक्रम आहे. 

योगविद्या धामच्या अभ्यासक्रमाबाबत काय सांगाल..  

योग विद्या धाममध्ये एक तासापासून ते 2 वर्षापर्यत योगाचे विविध अभ्यासक्रम आहेत. त्यातही दमा, हृदयाशी संबंधित समस्या, उच्च रक्तदाब, मधुमेह, पाठदुखी, संधिवात आदींवर विशेष अभ्यासक्रम आहेत. नागपूरच्या कालिदास विद्यापीठाशी धाम जोडले गेले आहे. त्याच्या माध्यमातून योग क्षेत्रात बीए आणि एमएचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचे शिक्षक्ष दिले जात आहे. तसेच योगावर 42 पुस्तके लिहिली असून 300 च्या वर मार्गदर्शनच्या सीडीज् बाजारात उपलब्ध आहेत. याद्वारे हजारो नागरिक योगाकडे वळत आहेत. 12 वर्षांपासून पुढील मुलांसाठी अभ्यासक्रम तयार करत आहोत.  

तुमच्या या कार्याची दखल सरकारने घेऊन तुम्हाला पुरस्कार जाहीर केला आहे...

पुरस्कार दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. 2016 साली योगासाठी पुरस्कार देण्याची घोषणा केली. 2017 मध्ये पुरस्कार वितरित केला जाऊ लागले. गतवर्षी केवळ एका संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला. यंदा मात्र, मला वैयक्तिक पुरस्कारासह मुंबईतील एका संस्थेला पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे माझ्यासह माझ्या सहकार्‍यांना काम करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. पुरस्कारामुळे योगाला राजाश्रय मिळाला आहे. यापुढे गप्प बसून चालणार नाही. 

भविष्यातील नियोजन काय आहे?

पुरस्काराच्या रक्कमेतून आश्रमाचा विस्तार करायचा आहे. तसेच योगाचा प्रचार व प्रसार ग्रामीण भागात आत्ता योग शिक्षक तयार करायचा उद्देश आहे. त्यावर कामही सुरू केले आहे. 
युवकांना काय संदेश द्याल?

जीवनात व्यसनांपासून दूर राहावे. तसेच निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली म्हणजेच योग. त्यामुळे जीवनात दररोज एक तास तरी योग साधना करावी. महत्वाचे म्हणजे योगाचे व्यापारीकरण थांबविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.