Fri, Nov 16, 2018 17:28होमपेज › Nashik › माजी सैनिकास अटक; न्यायडोंगरी येथे तणाव

माजी सैनिकास अटक; न्यायडोंगरी येथे तणाव

Published On: Sep 03 2018 1:41AM | Last Updated: Sep 02 2018 10:23PMन्यायडोंगरी : वार्ताहर

येथील वेशीतील हनुमान मंदिरात काही वर्षांपासून एका कोपर्‍यात विनाप्राणप्रतिष्ठेची झाकून ठेवलेली श्री दत्तगुरुंच्या मूर्तीचा हात तुटल्याने माजी सैनिक नंदकुमार आहेर यांच्यावर विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित म्हणून अटक केल्याने न्यायडोंगरी बाजारपेठेत दुसर्‍या दिवशी तणाव निर्माण झाला होता. त्याचवेळी सुरू असलेल्या ग्रामसभेतही सर्वानुमते निषेधाचा ठराव करून तहकूब करून एक आठवडाभर ग्रामसभा लांबणीवर टाकण्यात आली.

येथील दत्तमंदिरात मूर्ती बसविण्यासाठी श्रीराम ट्रस्टच्या वतीने 41 हजार रुपये किमतीची श्री दत्तगुरूंची मूर्ती काही वर्षांपूर्वी खरेदी करून वेशीतील हनुमान मंदिरात एका कोपर्‍यात झाकून ठेवली होती. परंतु, काही कारणास्तव काही वर्षे उलटूनही सदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून स्थानबद्ध करण्यात आलेली नव्हती. 

नेहमीप्रमाणे सकाळी मंदिर स्वच्छतेसाठी संजय साळुंखे हा युवक गेला असता त्याला सदर मूर्तीचा हात तुटलेला दिसला. तर याच जागेवर गावातील माजी सैनिक नंदकुमार आहेर याची कागदपत्रे असलेली बॅग आढळल्याने श्रीराम ट्रस्टच्या काही सदस्यांनी न्यायडोंगरी पोलीस चौकीत धाव घेऊन सदर घटनेची माहिती देऊन मंदिर स्वच्छता करणारे संजय साळुंखे यांच्या नावाने नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा झाला. त्यानुसार आहेर यांचा शोध घेऊन गावातून त्यांना ताब्यात घेऊन जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवाना केले. सदर बातमी दुसर्‍या दिवशी वार्‍यासारखी पसरताच बाजारपेठेत पोलीस चौकीसमोर शेकडो लोकांनी जमाव होऊन माजी सैनिक आहेर यांच्यावर राजकीय सुडातून कारवाई करून गुंतवण्यात आल्याचा आरोप करून तणाव निर्माण केला होता. काही वेळातच नांदगावचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी येऊन शांततेचे आवाहन केले. दरम्यान, तहकूब ग्रामसभा 8 सप्टेंबरला होणार असल्याचे सांगण्यात आले.