Thu, Apr 25, 2019 23:23होमपेज › Nashik › माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा उद्योजकांशी उद्या संवाद

माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा उद्योजकांशी उद्या संवाद

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 11:27PMनाशिक : प्रतिनिधी 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम हे शनिवारी (दि.7) नाशिकमध्ये येत असून, ‘देशाची अर्थव्यवस्था व त्यापुढील आव्हाने’ या विषयावर ते शहरातील उद्योजक, व्यावसायिक यांच्याशी संवाद साधणार आहेत. गंगापूर नाक्यावरील चोपडा लॉन्स येथे दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 या कालावधीत हा परिसंवाद होणार आहे.

काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर यांनी गुरुवारी (दि.5) काँग्रेस कमिटीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे व खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हेदेखील परिसंवादासाठी उपस्थित राहणार आहेत. पी.चिदंबरम हे भारताची अर्थव्यवस्था, वाढती महागाई, नोटाबंदीचे परिणाम, जीएसटी, औद्योगिक क्षेत्रातील मंदी, जागतिक अर्थव्यवस्थेचे भारतावर होणारे परिणाम या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.या परिसंवादास उपस्थित राहण्यासाठी शहरातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, बँकिंग क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, वकील, डॉक्टर, कापड व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, किरकोळ व घाऊक दुकानदार या सर्वांना पक्षाकडून निमंत्रणे देण्यात आली आहेत.

ज्येष्ठ पत्रकार खा.कुमार केतकर व माजी न्यायमूर्ती ठिपसे हे देशातील सद्यस्थितीवर भाष्य करणार आहेत. पी.चिदंबरम यांनी यापूर्वी ठाणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी परिसंवाद घेतले होते, असे आहेर यांनी सांगितले. नाशिकमधील उद्योजक, व्यावसायिक व अर्थव्यवस्थेशी निगडीत क्षेत्रात काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांनी परिसंवादासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आहेर यांनी केले. यावेळी प्रदेश प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील, माजीमंत्री डॉ.शोभाताई बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, महापालिका गटनेते शाहू खैरे आदी उपस्थित होते.