Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Nashik › खूप सहन केले आता बस्स झाले : शरद पवार

खूप सहन केले आता बस्स झाले : शरद पवार

Published On: Mar 11 2018 1:23AM | Last Updated: Mar 11 2018 1:23AMनाशिक : प्रतिनिधी

आधी नोटाबंदी आणि त्यानंतर पीककर्जमाफीच्या निर्णयानंतर शेतकरी तसेच सामान्य घटकांप्रति सरकारची नियत काय आहे हे स्पष्ट झाले आहे. खूप सहन केले आता बस्स झाले. शेतकरी, आदिवासी, महिला या सार्‍याच घटकांच्या आत्मसन्मानासाठी परिवर्तनाची गरज आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारवर टीका केली. विद्यमान सरकारला सत्तेतून बाजूला करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा समारोप शनिवारी (दि.10)  हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेने झाला. त्यावेळी  शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले, शेतकरी, तरुणांचे प्रश्‍न हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून मांडण्यात आले. त्यासाठी तयार केलेले वातावरण राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. त्याची गुंज दिल्लीतही  पोहोचली आहे. सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय हल्लाबोल थांबणार नाही, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

कोणतीही सत्ता फार काळ सामान्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. घोषणा करण्यात सरकारचा हात कोणी धरू शकत नाही. पण, प्रत्यक्षात द्यायचे मात्र काहीच नाही. शेती हा देशाचा कणा असून, 60 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. देशातील 125 कोटी जनतेची भूक भागविण्याची ताकद या शेतकर्‍यांच्या मगनटात आहे. देशात दरवर्षी 12 हजार शेतकरी आत्महत्या करतात, असे केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. कर्तृत्ववान शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ यावी, यावरून या घटकांबद्दलचा सरकारचा दृष्टिकोन नेमका काय आहे हे दिसून येते. इतरांना दिला त्याप्रमाणे मोबदला देण्याची मागणी धर्मा पाटील करीत होते. आता त्यांच्या पत्नीनेही आत्महत्येचा विचार बोलून दाखविला आहे. बळीराजावर आत्महत्येची वेळ आणणार्‍या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.  

शेतकर्‍यांबद्दल आस्था असणार्‍या  व्यक्तीच्या हाती सत्ता दिली की काय होते, हे आम्ही कृतीतून दाखवून दिले होते. पण, हे सरकार शेतकर्‍यांकडे ढुंकूनही पाहायला यार नाही, अशी टीका शरद पवार यांनी सरकारवर केली. शासनाकडून रस्ते, धरण, औद्योगिक वसाहती या कामांसाठी भूसंपादन केले जात असल्याने जमीन दिवसेंदिवस कमी होत आहे. माणसे मात्र वाढत आहेत. कुटुंबातील एक व्यक्ती शेतीव्यवसायात तर दुसरी नोकरीला अशी संधी सरकारने उपलब्ध करून द्यायला पाहिजे. अशा नीतीची गरज आहे. शेतीचे उत्पन्न घटले आहे. शेतमालाला योग्य किंमत दिली जात नसल्याने गुंतवणूक करण्याची ताकद शेतकर्‍यांमध्ये राहिली नाही. केंद्र सरकार म्हणते आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही. दुसरीकडे राज्य सरकार शंभर टक्के कर्जमाफी करू शकत नाही. म्हणजे या सरकारला शेतकर्‍यांबद्दल आत्मीयताच नाही. नोटाबंदीनंतर सर्वच जुन्या नोटा स्वीकारू, असे सरकारने जाहीर केले होते. जिल्हा बँकांमध्ये अजूनही जुन्या नोटांच्या स्वरूपात काही रक्कम शिल्‍लक आहे. ही रक्कम तुमच्या खात्यात तोटा म्हणून दाखवा, असे रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना पत्र पाठवून सांगत असल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी सभेत केला

सरकारची सर्वच घटकांप्रति नियत काय आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकार शेतकर्‍यांना किती गांभीर्याने घेत आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. आता राज्य सरकारनेही कर्जमाफी दिली. तरीही 25 हजार शेतकरी मोर्चाने मुंबईला जात असतील. घेराव घालणार असतील तर त्याचाही विचार सरकारने करावा. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू, अशी घोषणा सरकारने केली होती. मग, चार वर्षांत आठ कोटी रोजगार कुठे गेले, असा सवाल उपस्थित करीत पटेल यांनी नोटाबंदीच्या निर्णयाने कोट्यवधी लोकांचे रोजगार उद्ध्वस्त झाल्याची टीका केली. गुजरात, राजस्थान येथील निवडणूक निकालाने परिवर्तन सुरू झाल्याचेही ते म्हणाले.