Sun, Apr 21, 2019 04:42होमपेज › Nashik › आता बस्स झाले; मला उत्तर हवे आहे: एकनाथ खडसे

आता बस्स झाले; मला उत्तर हवे आहे: एकनाथ खडसे

Published On: Jan 26 2018 1:17AM | Last Updated: Jan 26 2018 1:17AMजळगाव : प्रतिनिधी

अनेक दिवसांपासून माझ्यावर फक्‍त आरोप होत आहेत. मात्र, त्याचे पुढे काय झाले, हे कोणीच सांगत नाही. त्यामुळे मी कोणता भ्रष्टाचार अथवा गैरव्यवहार केला असेल, तर सरकारने तो जनतेसमोर दाखवावा, असे आव्हान देतानाच आता बस्स झाले; मला उत्तर हवे आहे. पक्ष सोडण्याची इच्छा नाही; मात्र पक्षातून बाहेर ढकलले जात आहे. मला पक्ष सोडायला भाग पाडू नका, अशा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला दिला आहे. 

रावेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कृउबाचे संचालक राजीव पाटील यांच्या एकसष्टी गौरव सोहळ्यात आ. खडसे यांनी स्वकियांवर घणाघात केला.

आ. खडसे यांनी यावेळी आपल्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा समाचार घेताना, जर मी गुन्हेगार असेन, तर तुरुंगात टाका. परंतु, मला पक्ष सोडायला भाग पाडू नका, पक्ष सोडण्याची माझी शून्य इच्छा आहे. मात्र, मला बाहेर ढकलले जात असेल तर राजकारणात काहीही अशक्य नाही, असा इशारा भाजपाला दिला आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावर रंगलेल्या या आरोपांमुळे आ. खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

कार्यक्रमाला माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, आ. भाई जगताप, आ. हरिभाऊ जावळे, खा. रक्षा खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, विनायक देशमुख, माजी आमदार अरुणदादा पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार दत्तात्रय महाजन, संजय गरुड, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, सभापती माधुरी नेमाळ, उपसभापती अनिता चौधरी, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी आदी उपस्थित होते. माजी आमदार शिरीष पाटील यांनी प्रास्ताविक केले.