Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Nashik › माजी जिल्हा संघचालक बाळासाहेब अहिरे पंचत्वात विलीन 

माजी जिल्हा संघचालक बाळासाहेब अहिरे पंचत्वात विलीन 

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 16 2018 11:18PMनाशिक : प्रतिनिधी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा संघचालक बाळासाहेब अहिरे (88) यांचे रविवारी (दि.15) रात्री निधन झाले. निमा संघटनेचे माजी अध्यक्ष निशिकांत अहिरे यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी (दि.16) अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उद्योग जगत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अहिरे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मूळचे बागलाण तालुक्यातील असलेले बाळासाहेब व्यवसायाने कन्सलटिंग इंजिनिअर होते. पुढे मात्र, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी समारोह समितीचे ते महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष होते. देवबांध गणेश संस्कार केंद्राचे अध्यक्ष, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीत पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. राष्ट्रीय दृष्टिहीन कल्याण संघाचे ते पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. जिल्हा संघचालक म्हणून त्यांनी 15 वर्षे जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनाने सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता गंगापूर येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. अमरधाम येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, महेश हिरे, विभाग संघचालक कैलास साळुंखे, शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उद्योजक धनंजय बेळे, भाजपाचे प्रदीप पेशकार, लघुउद्योजक संघटनेचे संजय महाजन, उद्योजक विक्रम सारडा, मविप्रचे अ‍ॅड. सुनील ढिकले, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, नगरसेवक शशिकांत जाधव, माजी नगरसेवक मामा ठाकरे, नॅब संघटनेचे मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार, शंकराचार्य न्यासाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मोगल आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.