Tue, May 21, 2019 18:42होमपेज › Nashik › ‘अडथळामुक्‍त नाशिक’साठी दीड हजार टपर्‍या हटविणार

‘अडथळामुक्‍त नाशिक’साठी दीड हजार टपर्‍या हटविणार

Published On: May 03 2018 1:30AM | Last Updated: May 03 2018 12:10AMनाशिक : प्रतिनिधी 

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे सर्वांनाच पळताभुई थोडी झालेली असताना आता त्यांनी 2005 ते 2017 या बारा वर्षांच्या कालावधीत स्थायी समिती आणि महासभेत झालेले विविध प्रकारचे 1704 ठराव रद्द करण्याचा मोठा निर्णय आयुक्‍तांनी घेतला आहे. आयुक्‍तांच्या या निर्णयामुळे ठराव मंजूर करून शहरात रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी रोजगारासाठी उभारलेल्या शेकडो टपर्‍या हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.  

आयुक्‍त मुंढे यांच्या या निर्णयामुळे अनेक मोठे बदल घडणार असून, करवाढीनंतर आयुक्‍तांच्या या निर्णयाला शहरातून मोठा विरोध होऊ शकतो. यामुळे आता आयुक्‍तांच्या विरोधातील जनआंदोलनाची धार आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. अडथळे मुक्‍त शहर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आयुक्‍तांनी घोषणा केली होती. तसेच 2018-19 च्या अंदाजपत्रकातही आयुक्‍तांनी शहरातील रस्ते अडथळे मुक्‍त करण्याविषयी प्रस्ताव सादर केला होता. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्‍तांनी 2005-06 ते 2017-18 या 12 वर्षांच्या काळात स्थायी समिती आणि महासभेत झालेले सुमारे 1704 ठराव रद्द करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले असून, तसे पत्रही उपायुक्‍तांमार्फत काढण्यात आले आहे. त्यानुसार सहाही विभागांतील विभागीय अधिकार्‍यांनी या ठरावाची अंमलबजावणी करायची आहे. शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या आदेशानुसार संबंधित व्यावसायिकांसाठी अधिकृतरीत्या टपर्‍या ठेवण्यास मान्यता दिली जाते. परंतु, आयुक्‍तांच्या या आदेशामुळे मोठा गदारोळ उडणार आहे. कारण शहरातील अंध,अपंगांचा रोजगार आज या दुकानांच्या माध्यमातून सुरू आहे. महापालिकेतील पदाधिकारी तसेच नगरसेवकांच्या माध्यमातून स्थायी समिती आणि महासभेत विविध प्रकारचे ठराव केले जातात. यातील अनेक ठराव नियमानुसार नामंजूर केले जातात तर काही मंजूर केले जातात. आता आयुक्‍तांनी नियमानुसार मंजूर झालेल्या ठरावांचाही समावेश केल्याने आयुक्‍तांविरोधातील संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे.

आयुक्‍तांच्या या निर्णयानुसार शहरात रस्त्यांच्या कडेला किंवा मनपाच्या अन्य जागेत ठराव संमत करून ठेवण्यात आलेल्या अंध- अपंगांच्या टपर्‍या, दुकाने तसेच चर्मकार व्यावसायिकांसाठी ठेवण्यात आलेल्या टपर्‍या हलविण्यात येणार आहेत.

Tags : Nashik, obstruction, less, Nashik, one and a half thousand, pieces, removed