Tue, Apr 23, 2019 07:34होमपेज › Nashik › धावत्या रेल्वेतून भिरकावल्या पाचशेच्या नोटा! 

धावत्या रेल्वेतून भिरकावल्या पाचशेच्या नोटा! 

Published On: Aug 18 2018 6:25PM | Last Updated: Aug 18 2018 6:26PMजळगाव : प्रतिनिधी

शिरसोली- जळगाव रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेतून एक हजार तसेच पाचशे रूपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा फेकल्याची घटना काल (शुक्रवारी) घडली होती. हा प्रकार शिरसोली - जळगाव मार्गावर धानोरा परिसरात घडला होता. आज (शनिवारी) या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू होती. याबाबत जीआरपी तसेच आरपीएफ पोलिसांना विचारणा केली असता अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र धानोरा परिसरात या घटनेची जोरदार चर्चा रंगली होती.

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भुसावळकडून मनमाडकडे जात असलेल्या धावत्या रेल्वेतून एक हजार तसेच पाचशे रूपयांच्या नोटा एका व्यक्तीने थैलीतून फेकल्याने त्या रेल्वे रूळावर उडताना दिसल्या. हा प्रकार सकाळी आठ वाजेच्या दरम्यान धानोरा परिसरात रेल्वेमार्गावर घडला. या नोटांना मधोमध कापून तिचे दोन तुकडे केले होते. नोटांचे तुकडे उडताना दिसल्यानंतर काहींनी ह्या नोटा घेण्यासाठी धावाधाव केली. तर, अशाप्रकारे आजही एकाने नोटा फेकल्याची जोरदार अफवा होती. परंतु याबाबत माहिती देण्यास जीआरपी व आरपीएफ पोलिसांनी नकार दिला.

टक्केवारी घेऊन जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा देणारी टोळी सक्रिय झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून त्याचे कनेक्शन रावेर, भुसावळ, बोदवडसह औरंगाबादपर्यंत असल्याचा तर्क लावला जात आहे. मध्य प्रदेशातील इंदूर भंवरकुआ पोलिस स्टेशनच्या हददीत गुरूवारी रात्री एक कोटी पाच लाखांच्या जुन्या नोटांसह तीन संशयीतांना अटक करण्यात आली होती. यात रावेर, भुसावळ आणि सुरत येथील एकाचा समावेश आहे.

दरम्यान जुन्या नोटा मोठया प्रमाणात बाहेर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट झाल्याने या जुन्या नोटांची देवाणघेवाण करणाऱ्या टोळीचे धाबे दणादणले असून प्रकरण अंगलट येऊ नये, म्हणून धावत्या रेल्वेतून जुन्या नोटा रूळावर भिरकविल्या जात असाव्यात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे़.  

रेल्वेतून नोटा भिरकविल्याच्या अफवेची चौकशी करण्याच्या अनुषंगाने आज रेल्वे पोलिसांनी शिरसोली ते जळगाव रेल्वेमार्गावर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नोटा फेकणारे संशयीत इंदूर भंवरकुआ प्रकरणातील आहेत किंवा कसे? या अनुषंगाने देखील तपासावर भर दिला जात असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान जुन्या नोटा भिरकविल्याच्या प्रकाराची अफवा पसरल्यानंतर दिवसभर या विषयावर वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात आले.