Sun, Jul 21, 2019 16:57
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मच्छीमारांचा गिरणा धरणात जलसमाधीचा प्रयत्न

मच्छीमारांचा गिरणा धरणात जलसमाधीचा प्रयत्न

Published On: Dec 07 2018 2:44PM | Last Updated: Dec 07 2018 2:52PM
मालेगाव : पुढारी ऑनलाईन 

गिरणा धरण जलशयातील मासेमारीचा ठेका खासगी कंपनीला देण्यात आल्याने बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळल्याची भावना स्थानिक आदिवासी मच्छीमारांच्यात पसरली आहे. यामुळे स्थानिक आदिवासी मच्छीमारांनी आपल्या कुटुंबियांसमवेत शुक्रवारी दुपारी विसापूरमधील जलाशयात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करित आंदोलकांना पाण्याबाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आंदोलन ठिकाणी मत्स्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सुजाता साळुंके यांनी आंदोलकांशी चर्चा करित समस्या जाणून घेतली. यावेळी स्थानिक आदिवासी मच्छीमारांनी, ठेकेदाराची माणसे बुडित क्षेत्रातही मासेमारीपासून रोखतात, बोट, जाळे साहित्य जमा करून घेऊन जातात, माश्यांचे अत्यल्प भाव देतात अशा भावना मांडल्या. तसेच पिढीजात मासेमारी करणार्‍या आदिवासींवर उपासमारीची वेळ आल्यानेच ‘ज्या धरणावर उपजिविका होती, त्यातच जलसमाधी घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही, अशी वस्तुस्थिती असल्याचे गिरणा धरणग्रस्त मच्छीमार संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष एकनाथ वाघ यांनी सांगितले. 

यावेळी मासेमारीचा अधिकार अबाधित ठेवावा, ठेकेदाराने रोजगार उपलब्ध करुन द्यावा, या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला स्थानिक आदिवासी मच्छीमारांकडून देण्यात आला. तर यावेळी ठेकेदाराला आंदोलनाची कल्पना असूनही हजर नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर साळुंके यांनी ठेक्यातील अटी-शर्ती व मच्छीमारांच्या मागण्यांचा ताळमेळ घालून मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले.