Thu, Jul 18, 2019 05:00होमपेज › Nashik › पहिल्या मुळाला गेलेली नवरी दागिन्यांसह पसार!

पहिल्या मुळाला गेलेली नवरी दागिन्यांसह पसार!

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 11:14PMनांदगाव : प्रतिनिधी

थाटामाटात विवाह पार पडल्यानंतर पहिल्या मुळाला गेलेली नवरी दागिन्यांसह पसार झाल्याची घटना  उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी विवाहासाठी मध्यस्थी करणार्‍या महिलेस ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पोखरी येथील शेतकरी बाबूराव देवरे यांनी फिर्याद दिली आहे. बाबूराव यांचा मुलगा भगवान याच्या लग्‍नासाठी मुलीचा शोध सुरू होता. गावातीलच सोमनाथ भुरक (45) याने जालना, परभणी जिल्ह्यातील मुलगी सुचविली.  ठरल्याप्रमाणे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला.  यानंतर  9 एप्रिल 2018 रोजी थाटामाटात विवाह पार पडला. रितीरिवाजाप्रमाणे मनी-मंगळसूत्रासह सहा हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने सासरच्यांनी  नवरीच्या अंगावर घातले.  तर मध्यथी करणार्‍यांना एक लाख 20 हजार रुपयांची देणगीही दिली. मात्र,  सत्यनारायणाची पूजा होताच पहिल्या मुळासाठी 11 एप्रिल रोजी नवरीचे मेहुणे तिला घेण्यासाठी आले. 

त्यांचे यथोचित आदरातिथ्य करून मुलीला त्यांच्याबरोबर माहेरी पाठविण्यात आले. मेहुण्याने जातांना दोन दिवसांनी तिला घेऊन जा असे सागून घरातून निरोप घेतला. मात्र, दोन दिवसांनंतर बाबूराव देवरे सुनेला आणण्यासाठी आंबेडकरनगर, गल्ली नं.4, मुकुंदवाडी, औरंगाबाद येथे गेले असता, तेथे त्या नावाने कोणीही राहत नसल्याचे आणि गल्ली नं. 4 अस्तित्वातच नसल्याचे समजले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी नांदगाव पोलीस ठाणे गाठले. लग्न लागल्यानंतर तीन  दिवसांतच नवरी पूर्वनियोजित कटानुसार पळून जाते. याचे प्रत्यंतर देणारी घटना घडल्याने, लग्नाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणारी टोळीच सक्रिय असल्याची भीती व्यक्‍त होत आहे. पळून गेलेल्या नवर्‍या मुलीचे नाव अश्‍विनी सांगण्यात आले असून,  तिचे काका अनिल, छाया नावाची बहीण,  सोमनाथ भुरक, बळीराम चव्हाण, भाऊसाहेब गागरे यांच्या साक्षीने मध्यस्थींना एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. तर मुलीचा मेव्हणा संजय मोरे या नावाने आला होता.

असा लागला मध्यस्थ मावशीचा तपास

केवळ मुलीचा मेहुणा असलेल्या व्यक्तीच्या मोबाइलवर वारंवार फोन करून देवरे यांच्या नातेवाइकांनी नवी युक्ती काढून या प्रकरणाचा शोध घेतला आहे. मध्यस्थ मावशीला आमच्याकडे आणखी एक मुलगा असून, त्याच्यासाठीही मुलगी पाहण्याचे सांगितले. ठरल्यानुसार, मावशीला मनमाड येेथे बोलविण्यात आले. यावेळीए नांदगावहून अंनिसचे  कार्यकर्ते  भगीरथ जेजुरकर, अमोल कुलकर्णी, कैलास पठाडे यांनी मनमाडच्या रेल्वे स्टेशन  सुनीता पाटोळे व तिच्या बरोबर असलेल्या महिलेशी संपर्क साधला. यानंतर त्यांना गोड बोलून स्थेशनबाहेर आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमेश पवार तपास करत आहेत.