Mon, May 20, 2019 18:03होमपेज › Nashik › ‘पुनंद’च्या कार्यालयाला आग

‘पुनंद’च्या कार्यालयाला आग

Published On: Aug 20 2018 1:38AM | Last Updated: Aug 19 2018 10:44PMकळवण : बापू देवरे

तालुक्यातील पुनंद उजवा कालवा व सुळे उजवा कालव्याच्या जलसंपदा विभाग कार्यालयाला आग लागल्याने महत्त्वाचे शासकीय कागदपत्रे जाळून खाक झाली आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की लावून देण्यात आली, अशी चर्चा सुरू आहे.

जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला रविवारी (दि.19) पहाटे आग लागल्याची घटना घडली. आगीत कार्यालयातील दप्तर, संगणक व इतर साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी सटाणा नगर परिषदेच्या अग्‍निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. या आगीत दोन वेगवेगळ्या कार्यालयांतील फक्‍त दप्तर असलेल्या खोलीतच आग कशी लागली, याबाबत चर्चा सुरू आहे. आगीत सुळे उजवा कार्यालयात वाघाड धरणाचे 1980 मधील रोजगार हमी योजनेची महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. तसेच सुळे डावा कालव्यातील महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत. कॉम्प्युटर व खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. दोन महिन्यापूर्वी सुळे उजवा कालव्यातील गैरव्यवहार उघड झाला होता. याबाबत दैनिक पुढारीत वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर मंत्रालय स्तरावरून चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.