होमपेज › Nashik › विखे पाटील बँकेवर आर्थिक निर्बंध

विखे पाटील बँकेवर आर्थिक निर्बंध

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:36PMनाशिक : प्रतिनिधी

गंगापूर रोडवरील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादले असून, ठेवीदारांना खात्यातून किमान सहा महिने तरी मर्यादित रक्‍कम काढता येणार आहे. विखे पाटील बँकेचे एकूण ठेवीदार सहा हजार इतके असून, ठेवी सात कोटींच्या घरात आहेत. रिझर्व बँकेने 19 मे रोजी यासंदर्भात आदेश काढले आहेत. या निर्बंधामुळे ठेवीदारांना केवळ एक हजार रूपयांपर्यंतच रक्कम खात्यातून काढता येणार आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम काढण्यास मात्र मनाई करण्यात आली आहे. तसेच नवीन कर्जवाटपालाही पायबंद घालण्यात आला आहे. हे निर्बंध सहा महिन्यांपर्यंत लागू असल्याने ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. 

एनपीए वाढला असून, ठेवीदेखील कमी झाल्याने रिझर्व बँकेने निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे निर्बंध लादण्याच्या निर्णयाविरोधात विखे पाटील बँकेच्या संचालकांनी भूमिका मांडली आहे. रिझर्व बँकेने 2017 च्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला असल्याचे संचालक मंडळाचे म्हणणे आहे. त्यावेळी बँकेचा एनपीए 30 टक्के एवढा होता. सध्या हाच एनपीए 18 टक्क्यांवर आला आहे.  2017-18 च्या ताळेबंदानुसार बँकेच्या ठेवी आणि कर्जवाटपाचा विचार करता बँकेत पुरेशी रोखता उपलब्ध असल्याने बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. ठेवीदारांनी घाबरून न जाता बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.