Mon, Aug 19, 2019 05:39होमपेज › Nashik › गढूळ पाणीपुरवठा करणार्‍या वाहिनीचा अखेर शोध सुरू

गढूळ पाणीपुरवठा करणार्‍या वाहिनीचा अखेर शोध सुरू

Published On: Jun 22 2018 2:06AM | Last Updated: Jun 21 2018 11:12PMसिडको : प्रतिनिधी 

परिसरातील तुळजाभवानी चौकात गेल्या चार दिवसांपासून होणार्‍या गढूळ पाणीपुरवठा प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. दै. ‘पुढारी’मध्ये गुरुवारी (दि.21) वृत्त प्रसिद्ध होताच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने गढूळ पाणीपुरवठा कोठून होतो, त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.

तुळजाभवानी चौकात चार ते पाच दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत परिसरातील महिलांनी तक्रार करूनही मनपाकडून दखल घेतली जात नव्हती. अखेर या महिलांनी मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली होती. याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये गुरुवारी ‘सिडकोतील तुळजाभवानी चौकात चार दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यावर सिडकोच्या प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी तातडीने मनपा अधिकार्‍यांची बैठक घेत याप्रश्‍नी जाब विचारला. 

या भागातील जलवाहिनीमध्ये मिसळणार्‍या ड्रेनेजवाहिनीचा शोध घेण्याचे सांगून परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश सभापती बडगुजर यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले. बैठकीला विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता दौलत घुले व अधिकारी उपस्थित होते.