नाशिक : प्रतिनिधी
आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर केल्याप्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार, सचिव काळे यांच्यासह तीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (दि.19) नाशिकच्या तहसीलदारांना दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आचारसंहितेच्या काळात बाजार समितीच्या वाहनाचा वापर करण्यात आल्याचे प्रकरण दै. ‘पुढारी’ने उघडकीस आणले होते. अखेर जिल्हाधिकार्यांनी त्याची दखल घेत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची सध्या अचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या काळातच बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार यांनी समितीच्या एमएच 15 ईएक्स 3795 या वाहनातून पिंपळगावपर्यंत प्रवास केला. यावेळी बाजार समितीचे संचालक युवराज कोठुळे, दिलीप थेटे, रवींद्र भोये आदी होते. वाहन वापरताना या सर्वांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. पिंपळगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात केलेल्या विविध विकासकामांना भेटी दिल्या होत्या. दरम्यान, याबाबतचे वृत्त दै. ‘पुढारी’त 6 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होेते. या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशी केली. यामध्ये बाजार समितीचे सचिव आणि वाहनचालकाचे जाबजबाब प्रशासनाने नोंदवून घेतले. तसेच संबंधित संचालकांकडून खुलासा मागविला होता.
संबंधित संचालकांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांकडेत्यांचा खुलासा सादर केला. त्यात निवडणूक आयोगाचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचा दावा केला आहे. तसेच वाहन हे सचिवांच्या अधिपत्याखाली असून, त्याबाबतचे लॉगबुकही त्यांच्याकडेच असल्याचे नमूद केले आहे. तसेच चालकाने सचिवांच्या परवानगीशिवाय वाहनाचा उपयोग केल्याचेही खुलाशात नमूद केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचे उघड झाल्याने जिल्हाधिकार्यांनी उपसभापती तुंगार, संचालक युवराज कोठुळे, दिलीप थेटे, रवींद्र भोये यांच्यासह समितीचे सचिव काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नाशिक तहसीलदारांकडून पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिराने गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.