Sun, Aug 18, 2019 20:36होमपेज › Nashik › राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहाणेंचा अर्ज दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहाणेंचा अर्ज दाखल

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 02 2018 11:57PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक विधान परिषद  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी बुधवारी (दि.2) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.  दुपारी सव्वादोन वाजता अ‍ॅड. सहाणे आणि पक्षाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. अडीचच्या सुमारास सहाणे यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. अ‍ॅड. सहाणे यांचा अर्ज भरताना विद्यमान आमदार जयंत जाधव हेही जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात हजर होते. यावेळी अर्ज दाखल करताना जाधव हे भावूक झाल्याचे दिसून आले. सहाणेंनी अर्ज भरताच जाधव यांनी त्यांची गळाभेट घेत दालनातून काढता पाय घेतला. मात्र, दालनाच्या बाहेर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या नजरेतून हा प्रसंग सुटला नाही. दरम्यान, याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आ. जयंत जाधव, दिलीप बनकर, आ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे आदी उपस्थित होते. 

एबी फॉर्मवरून चर्चा

पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत सहाणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र, या अर्जासोबत एबी फार्म न दिल्याचे पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले. दरम्यान, याबाबत सहाणे यांच्याशी संपर्क साधला असता पक्षातर्फे एबी फॉर्म देण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 3) तो सादर केला जाईल असे अ‍ॅड. सहाणे यांनी दिली.

सिद्धेश्‍वराला साकडे

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अ‍ॅड. सहाणे यांनी सायंकाळी घारपुरे घाट येथील सिद्धेश्‍वर मंदिरात गेले. यावेळी त्यांनी भगवान सिद्धेश्‍वराच्या चरणी लीन होत महापूजा केली. तसेच विजयासाठी देवाला साकडे घातले.

Tags : Nashik, Filing, application, NCP