Tue, Apr 23, 2019 23:52होमपेज › Nashik › सटाणा येथे दोन गटांत राडा

सटाणा येथे दोन गटांत राडा

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 12:14AMसटाणा : वार्ताहर 

नमाज अदा करून मशिदीतून बाहेर पडताच शुक्रवारी (दि.16) येथील मुस्लिम समाजाच्या दोन गटांत पूर्ववैमनस्यातून राडा झाला. दोन्ही गटांच्या युवकांनी दगडफेक करून एकमेकांवर हल्ला चढवला. 

दुपारी झालेल्या घटनेमुळे बाजारपेठेत घबराट पसरली होती.झालेल्या हाणामारीत दोन्ही गटांचे आठहून अधिक जण जखमी झाले असून, मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळविल्यानंतर परिसरात दंगलविरोधी पथकासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

गेल्यावर्षी पवित्र रमजानच्या पहिल्याच दिवशी राडेबाजी झाल्यानंतर यंदा तीन महिने आधीच वादाला तोंड फुटले आहे. शुक्रवारी  मध्यवस्तीतील जामा मशिदीत  दुपारचे नमाज पठण पार पडल्यानंतर बाहेर पडताच दोन्ही गटांतील युवकांमधील वाद उफाळून आला.काही क्षणातच दोन्ही गटांकडून एकमेकांवर दुफान दगडफेक सुरू झाली. काही युवकांनी हातात काठ्या, गज आदी हत्यारे घेवून हल्ला केल्याने पळापळ झाली. त्यामुळे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी कळविल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोन्ही गटांची गर्दी पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेतील आठ जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेेथे प्राथमिक उपचार करून सगळ्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. 

पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक एच. एम. पाटील यांनी घटनास्थळी थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवले. मस्जिद परिसरात दंगलविरोधी पथकासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, शहरात तणावपूर्ण शांतता कायम होती. पोलिसांनी याप्रकरणी धरपकड सुरू करून तत्काळ तीन संशयितांना ताब्यात घेतले तर जखमींनाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले. या घटनेने शहरातील शांतता भंग झाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags : nashik, nashik news, Satana, crime, Muslim community, Fight,