Thu, Jul 18, 2019 21:34होमपेज › Nashik › शेतमालाची आवक घटली

शेतमालाची आवक घटली

Published On: Jun 03 2018 1:17AM | Last Updated: Jun 02 2018 10:57PMनाशिक : प्रतिनिधी

शेतकरी संपाच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि.2) जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील शेतमालाच्या आवकेवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. पिंपळगाव बसवंतमध्ये 22, तर लासलगावला केवळ पाच ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी आला. दरम्यान, शेतमालाची आवक सरासरी 30 टक्के घटली. दुसरीकडे दूध संकलनावरही परिणाम झाला. 

कर्जमुक्ती, शेतमाल व दुधाला हमीभाव तसेच विविध मागण्यांसाठी किसान सभेने शुक्रवारपासून (दि.1) देशव्यापी शेतकरी संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यावर काही परिणाम झाला नसला तरी दुसर्‍या दिवशी मात्र त्याचे पडसाद पाहायला मिळाले. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 17 बाजार समित्या खुल्या ठेवण्यात आल्या. मात्र, संपाच्या धास्तीने शेतकर्‍यांनी शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणला नाही. परिणामी एरवी गजबजलेल्या बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसत होता. कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत गत आठवड्यात दिवसाला सरासरी दोन हजार ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी येतो. मात्र, शनिवारी केवळ पाचच टँक्ट्रर कांदा विक्रीसाठी आल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, पिंपळगाव बसवंतमध्ये वेगळी परिस्थिती नसून तेथे सरासरी दीड हजार ट्रॅक्टर विक्रीसाठी  कांदा येतो. मात्र, तेथेही आवक मंदावली. दरम्यान, बागलाण, कळवण तसेच इतर बाजार समित्यांमध्ये वांगी, दुधीभोपळ्यासह इतर भाज्यांची आवक काहीशी रोडावली.

भाजीपाल्याबरोबरच सलग दुसर्‍या दिवशीही जिल्ह्यातील दूध संकलनावर संपाचा परिणाम दिसून आला. नाशिक, सिन्नर व येवला तालुका संघ मिळून तब्बल आठ हजार लिटर संकलनात तफावत आली. खासगी क्षेत्रातील संघांच्या संकलनावरही संपाचा परिणाम जाणवला. दरम्यान, जिल्ह्यात दुसर्‍या ठिकाणाहून येणार्‍या दुधाची आवक सुरळीत होती. 

शेतमाल विक्रीसाठी आणावा : खेडकर

शेतकरी संपाबाबत बाजार समित्यांचे प्रतिनिधी, पोलीस व महसूल प्रशासनाच्या तालुक्यात बैठका घेण्यात आल्या. संपावेळी शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी कोणतीही अडचण येऊ नये, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. दरम्यान, शेतकर्‍यांनीदेखील कोणाच्याही दबावात न येता त्यांचा शेतमाल तसेच दूध विक्रीसाठी बाजारात आणावे. तसेच कोणी विरोध करत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील 1077 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तत्काळ संबंधितांना पोलीस संरक्षण देण्यात येईल, असेही खेडकर यांनी स्पष्ट केले.