Thu, May 23, 2019 21:07
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › बागलाणमध्ये शेतकरी आंदोलनाची हवा गूल

बागलाणमध्ये शेतकरी आंदोलनाची हवा गूल

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:22PMसटाणा :  सुरेश बच्छाव

वेगवेगळ्या जनआंदोलनाचे उगमस्थान राहिलेल्या आणि शेतकरी संघटनेचे जन्मस्थान समजल्या जाणार्‍या बागलाणमध्ये यावेळच्या शेतकरी संपाची मात्र बिलकुलच हवा दिसली नाही. संपाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि.1) शहर, तालुक्यात थेट आणि विशेष परिणाम दिसून आलेले नसताना त्यानंतर तर सर्वच व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. सर्व प्रकारच्या शेतमालाची खरेदी-विक्री नेहमीप्रमाणे आलबेल असून, कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे कामकाजही विनाव्यत्यय चालू आहे. शहरात भरणारा भाजीपाला लिलावही नेहमीप्रमाणे सुरू असून, दूधविक्रीवरही कसलाच परिणाम झालेला नाही. सर्व प्रकारच्या शेतमालाला स्थानिक व जवळपासच्या बाजारपेठेतच ग्राहक मिळत असून, बाहेरील बाजारपेठेत मोठ्या स्वरूपात जाणार्‍या भाजीपाल्याचे व्यवहारही पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदाच्या शेतकरी संपाला बागलाणवासीयांनी विशेष मनावर घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.     

संपाच्या पहिल्याच दिवशी समितीचे व्यवहार पुन्हा सुरू झाले. विशेष म्हणजे शेतमालाची आवकसुद्धा कायम राहिली. त्यामुळे कांद्यासह भुसार लिलाव सुरळीत पार पडले. शनिवारी भरणारा येथील आठवडे बाजारसुद्धा नेहमीप्रमाणे भरला. त्यानंतर जवळपास सर्वच शेतमालाचे व्यवहार पूर्वपदावर आल्याचे दिसून आले. दररोज सकाळी शहरात भरणारा भाजीपाला लिलाव सोमवारी (दि.4) नेहमीप्रमाणे भरला आणि त्यासाठी भाजीपाल्याची आवकसुद्धा वाढल्याचे दिसून आले.

बाजार समितीतही सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले. सोमवारी कांद्याची सुमारे 3000 क्‍विंटल आवक होती. विशेष म्हणजे कांद्याला सरासरी 850, तर जास्तीत जास्त 1015 रुपये हा हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला. भुसार मालाचीही आवक राहिल्याने त्याचे लिलावही विनाव्यत्यय पार पडले. आंदोलनाच्या धास्तीने शेतकर्‍यांकडून भाजीपाल्याची ठोक स्वरूपात खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनी पहिल्या दिवशी खरेदी बंद केली. मात्र, त्यानंतर मालाच्या ने-आणसाठी कुठेही अडथळा नसल्याची खात्री झाल्यानंतर तालुक्यातून बाहेरील बाजारपेठेत जाणार्‍या भाजीपाल्याच्या उलाढालीला पुन्हा वेग आला आहे. शहर, तालुक्यातून ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून बाहेर जाणार्‍या मालाचे प्रमाण काहीअंशी रोडावले असले तरी त्यासाठी संपाऐवजी मालाला बाहेर उठाव नसल्याचे कारण असल्याचे सांगितले गेले. शहर, तालुक्यातील दूधविक्री मात्र पहिल्याच दिवसापासून नेहमीप्रमाणे सुरू असून, घाऊक विक्रेत्यांकडे तसेच नेहमीच्या गिर्‍हाईकाकडे दूध पोहोच केले जात आहे. 

शेतकरी संघटनांच्या अंतर्गत राजकारणाला येथील बळीराजे हेरले असून, संपात सक्रिय सहभाग न नोंदवल्याने आंदोलनाची हवा गूल झालेली दिसून येत आहे. शिवेसना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे व सहकार्‍यांनी शेतकर्‍यांना सोबत घेत केलेले प्रतीकात्मक आंदोलन आणि प्रहार संघटनेने बाजार समितीला दिलेले निवेदन यापलीकडे संपादरम्यान तालुक्यात कुठेही परिणामकारक आंदोलन झाले नसल्याचे दिसून आले आहे. याअर्थी बागलाणवासीयांनी या शेतकरी आंदोलनाकडे पाठच फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.