Tue, May 21, 2019 18:50होमपेज › Nashik › ‘कुटुंबकल्याण’ ही पुरुषांची ‘दुखरी नस’!

‘कुटुंबकल्याण’ ही पुरुषांची ‘दुखरी नस’!

Published On: Jun 22 2018 2:06AM | Last Updated: Jun 21 2018 11:18PMनाशिक : संदीप दुनबळे

लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दरवर्षी राबविण्यात येत असला तरी नियोजनाचा भार महिलांवरच अधिक पडत असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे. चार वर्षांत 80,694 महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतलेली असताना त्या तुलनेत पुरुष शस्त्रक्रियांचा आकडा अवघा 4,864 इतक ाच आहेत. शस्त्रक्रिया करून घेणारे पुरुष सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्‍वर या आदिवासीबहुल भागातील  आहेत हे विशेष! अन्य क्षेत्रात आपलीच मक्तेदारी समजणारे पुरुष कुटुंब नियोजनात मात्र महिलानांच पुढे करीत असल्याचे वास्तव सांगणारी ही आकडेवारी आहे. 

लोकसंख्येला आळा घालण्यासाठी दोनपेक्षा अधिक मुले असणार्‍या दाम्पत्यांना सेवा सवलती नाकारल्या जात आहेत. तसेच, कुटुंब नियोजनाची अनेक साधनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एक किंवा दोन अपत्ये झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाकडून दरवर्षी कार्यक्रम हाती घेतला जात असून, उद्दिष्ट ठरविले जात आहे. या कामात मात्र पुरुषांची उदासीनता दिसून येत आहे. 2017-18 मध्ये अवघ्या 993 पुरुषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. तर शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची संख्या होती 17,410 एवढी. म्हणजे पुरुषांचे प्रमाण तुलनेने अगदी जुजबीच होते.

2016-17 मध्ये 18,639 महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतलेल्या असताना पुरुष शस्त्रक्रियांचे प्रमाण अवघे 1,109 एवढे होते. 2015-16 मध्येही असेच विषम प्रमाण दिसून आले. 21,703 महिलांनी तर 1,305 पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या. 2014-15 मध्ये 22,822 महिला तर 1,457 पुरुष याप्रमाणे कुटुंब नियोजनाचे काम करण्यात आले. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतल्यास त्याचे विपरीत परिणाम वैवाहिक जीवनावर होतील, असा गैरसमज पुुरुषांमध्ये असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळेच नियोजनाच्या कामात महिलांना पुढे करून पुरुषांनी एकप्रकारे जबाबदारीच झटकल्याचे आकडेवारी सांगते. कुटुंबाचा गाडा हाकताना असो वा नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी महिलांना दुय्यम स्थान दिले जात असताना कुटुंब कल्याण नियोजनातून मात्र पुरुषांनी माघार घेतल्याचेही चार वर्षांतील आकडेवारी स्पष्ट करते. दुसरीकडे पुरुषांच्या मनातील गैरसमज दूर करण्यात आरोग्य विभागालाही अद्याप यश मिळू शकलेले नाही. 

ते पुरुष आदिवासी भागांतील

विशेष म्हणजे, या आकडेवारीतील पुरुषांवर झालेल्या शस्त्रक्रिया या जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबक यांसारख्या आदिवासी भागांतील आहेत. आदिवासी भागांतील पुरुषांमध्ये याबाबत पुढारलेपण दिसून येते. ते स्वत:च शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पुढे येतात. याउलट शहरी पुरुषांमध्ये भीती असते. शस्त्रक्रिया केली तर तब्येत तसेच पौरुषात्वावर परिणाम होईल, शरीरसंबंधात बाधा येईल, असा काही पुरुषांचा गैरसमज आहे. तर कुटुंब नियोजनाचे काम हे महिलांचेच असून, महिलेनेच शस्त्रक्रिया करायला हवी, असे मतही काही पुरुषांचे असते. अशीच मानसिकता बर्‍याच महिलांचीही असते. प्रसूती होताच शस्त्रक्रिया करून घेण्याकडे त्यांचा कल असतो.