Sat, Mar 23, 2019 12:27होमपेज › Nashik › आंदोलक शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल

आंदोलक शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 1:48AMघोटी : वार्ताहर

बाजाराची जागा स्थलांतर होणे व भाजीपाल्याला मिळणारा कवडीमोल भाव याविरुद्ध शेतकर्‍यांनी शनिवारी (दि.17) मुंबई-आग्रा महामार्गावर ठिय्या आंदोलन व रास्ता रोको केला. मात्र, शेतकर्‍यांनी जमावबंदीचा आदेश मोडल्याचा ठपका ठेवत शासनाने याविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे तालुकाभर संताप व्यक्‍त होत आहे.

शेतीमालाला  कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या गलथान कारभाराविरुद्ध मुंबई-नाशिक महामार्गावर शनिवारी (दि.17) आंदोलन केलेल्या आंदोलकांवर घोटी पोलीस ठाण्यात जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बाजार समिती आवारातून भाजीपाला स्थलांतरित करताना कोणताही शेतीमाल विक्रेत्याला विश्‍वासात न घेता व याबाबत वर्तमानपत्रातदेखील सालाबादप्रमाणे माहिती प्रसारण न करता करण्यात आलेल्या बदलाने शेतीमाल विक्रेत्यांनी केलेल्या बाजार समिती संचालक, सचिव व व्यापार्‍यांकडून होणार्‍या मनमानीविरोधात आंदोलन करीत मुंबई-नाशिक महामार्गावर चक्‍काजाम करीत दोन तास वाहतूक थांबवल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे पांडुरंग शिंदे, भास्कर गुंजाळ, बाळासाहेब धुमाळ यांसह अनोळखी शंभर ते दीडशे शेतीमाल विक्रेते आंदोलनकर्त्यांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे. आंदोलनादरम्यान आंदोलकांना कृषी उत्पन्‍न बाजार समितीकडून लेखी आश्‍वासन दिल्यानुसार बाजार समिती आवारात सोमवारी (दि.19) सकाळी अकरा वाजता होणार्‍या शेतीमाल विक्रेते व संचालक, व्यापार्‍यांची बैठक ठेवण्यात आली आहे. या सर्व घटनेचे तीव्र पडसाद होणार्‍या बैठकीदरम्यान उमटणार नाही, यासाठी सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव लक्ष ठेवून आहे.

बाजार समितीचे सचिव सांगळे यांनी बाजार समितीमध्ये सुविधांची वानवा असताना त्यांनी आंदोलक शेतीमाल विक्रेत्यांवर राजकीयद‍ृष्ट्या केलेले आंदोलन असल्याचे मीडियासमोर आपली प्रतिक्रिया देत यास भलतेच वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सभापती, उपसभापती, संचालक शेतीमालाची विक्री करणार्‍यांविरोधात होणार्‍या बैठकीत काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे.