Sat, Jul 20, 2019 23:32होमपेज › Nashik › .. तर सर्वच कामे मार्गी लागली असती

.. तर सर्वच कामे मार्गी लागली असती

Published On: Mar 14 2018 12:51AM | Last Updated: Mar 13 2018 11:53PMनाशिक : प्रतिनिधी

तत्कालीन आयुक्‍त अभिषेक कृष्णा असते तर आज बहुतांश विकासकामांचे नारळ फुटले असते, अशी खंत भाजपा पदाधिकार्‍यांनी मंगळवारी (दि.13) व्यक्‍त केली. मनपाची सूत्रे हाती घेऊन भाजपाच्या कारकिर्दीची बुधवारी (दि.14) वर्षपूर्ती होत आहे. त्या अनुषंगाने वर्षभर झालेल्या कामगिरीचा आढावा घेताना अनेकांनी अप्रत्यक्षरीत्या आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी विविध विकासकामांवर आणलेल्या बंधनाविषयी नाराजी व्यक्‍त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिषेक कृष्णा यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांना नाशिकची सूत्रे बहाल केली. थेट मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनेच ही नियुक्‍ती झाल्याने मुंढे हे नाव ऐकताच अनेकांचे हातपाय त्याचवेळी गळाले होते. यामुळे मुंढे यांनी महापालिकेत पाय ठेवताच अनेक जण कामाला लागले. एक-एक करता मुंढे यांनी आपल्या कारकिर्दीप्रमाणे काम सुरू केल्याने कर्मचार्‍यांपासून अधिकारी ते नगरसेवकांनाही त्यांच्या कामकाजाचा दणका बसू लागला. महासभेबरोबर प्रभाग समित्यांमधील विकासकामांचे प्रस्ताव थांबविण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले. तसेच, नगरसेवक निधीअंतर्गत होणार्‍या विकासकामांच्या प्रस्तावांनाही लालफितीत अडकविल्याने नगरसेवकांमधून असंतोष निर्माण होऊनही सध्या हे सर्व गपगुमान सहन करण्याची वेळ भाजपेयींवर आली आहे.

हे कमी की काय म्हणून आमदार आणि पदाधिकार्‍यांनी मिळून तयार केलेला 257 कोटींच्या रस्त्यांच्या कामांनाही आयुक्‍तांनी ब्रेक लावल्याने प्रभागांमधील रस्त्यांची कामेही थांबली. यासंदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. असे असताना ही कामे थांबविण्याबाबत आयुक्‍तांनी लेखा व वित्त विभाग तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिल्याने अनेकांच्या तोंडचा घास हिरावला गेला. आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या आमदार निधीतून त्यांच्या मतदारसंघात येणार्‍या प्रभाग पाचमधील गटार योजनेचे कामालाही प्रशासनाने लालबत्ती दाखविल्याने पदाधिकारी व आमदारांमधील असंतोष वाढला.

एकूणच प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे सध्या शहरातील कामे थांबली असल्याने नाराज झालेल्या पदाधिकार्‍यांनी त्याविषयी अखेर गुळणी फोडली. गेल्या वर्षभरात भाजपाने शहराचा कारभार हाती घेतल्यानंतर कोणकोणती कामे केली याविषयी माहिती देताना त्यांनी तत्कालीन आयुक्‍त अभिषेक कृष्णा असते तर आज अनेक विकासकामांचे नारळ फुटले असते, अशी खंत बोलून दाखविली. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरूस्कर, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी आदींसह प्रभाग समिती सभापती उपस्थित होते.