Fri, Apr 26, 2019 19:27होमपेज › Nashik › नाशिक मनपाचीच स्मार्ट रोडसाठी कसरत

नाशिक मनपाचीच स्मार्ट रोडसाठी कसरत

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:38AMनाशिक : प्रतिनिधी

स्मार्ट रोड साकारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने हा मार्ग महापालिकेसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. यामुळे स्मार्ट रोडबाबत तडजोड करूनच रस्ता तयार करण्याच्या मानसिकतेत स्मार्ट कंपनी आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागणार्‍या जागेसाठी कंपनीने नगररचना विभागाला माहिती सादर केली असून, मिळणार्‍या जागेवरच या रस्त्याची भिस्त अवलंबून राहणार आहे. 

तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा 1.1 कि.मी. चा स्मार्ट रोड साकारला जाणार आहे. रस्ता बनविण्यापूर्वी स्मार्ट सिटी कंपनीने अनेक सोयी सुविधा दाखविल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र या सुविधा रस्त्यावर उतरविणे आता कठीण बनू लागले आहे. अशोकस्तंभ ते मेहेर सिग्नल आणि सीबीएस ते त्र्यंबक नाका या भागात अनेक खासगी मालमत्ता आहेत. यामुळे या मालमत्ताधारकांकडून रस्त्यासाठी जागा मिळणे गरजेचे आहे. त्याबाबत स्मार्ट कंपनीने केवळ नकाशा तयार करून कोणत्या मालमत्तांच्या जागा मिळणे आवश्यक आहे या बाबतचा आराखडा तयार करून यादीच नगरचना विभागाकडे सादर केली आहे.

त्यानुसार संबंधितांना नोटिसा बजावल्या जातील आणि त्यानंतर मनपा आयुक्‍तांच्या अधिकारात कलम 210 वापरून या जागा ताब्यात    घेण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाकडून होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी सात-सात मीटरचा रस्ता, त्यानंतर प्रत्येकी दीड-दीड मीटरचा सायकल ट्रॅक आणि त्यानंतर किमान दीड ते दोन मीटरचा फुटपाथ अशी स्मार्ट रोडची रचना आहे. परंतु, अशोकस्तंभ ते मेहेर आणि सीबीएस ते त्र्यंबक नाका (मेहेर ते सीबीएस भाग वगळून) या भागात कमी जागा मिळत असल्याने फुटपाथ बसणे अवघड आहे. त्यासाठी जागा मिळाली तर फुटपाथचा विचार केला जाणार आहे. अन्यथा जागा नसलेल्या ठिकाणापुरती फुटपाथवर फुली मारली जाण्याची शक्यता आहे. यामुळे स्मार्ट रोड तयार करताना मनपा प्रशासन आणि नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीला तारेवरची कसरत करतच या मार्गावरून मार्गक्रमण करावे लागणार आहे.