Fri, Apr 26, 2019 18:11होमपेज › Nashik › अभियंता सक्‍तीच्या रजेवर की कार्यमुक्‍त?

अभियंता सक्‍तीच्या रजेवर की कार्यमुक्‍त?

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 12:17AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवायचे की कार्यमुक्‍त करावयाचे यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय महसूल आयुक्‍तांमार्फत सरकारला पाठविण्यात आला असून, नेमका काय निर्णय घ्यायचा तो सरकारच घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या विशेष सर्वसाधारण सभेत वाघमारे यांनी सदस्यांना उर्मट उत्तरे दिली आणि त्याविरोधात सर्वच सदस्यांनी एकजूट दाखवित आक्रमक पवित्रा घेतला होता. सदस्य यशवंत शिरसाठ यांना आधीही दालनातून बाहेर काढण्यापर्यंत वाघमारे यांची मजल गेली होती. मागविलेल्या माहितीसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून माहिती घ्या, असे उत्तर वाघमारे यांनी शिरसाठ यांना दिले होते. यावर सभेत विचारणा झाल्यावर सदस्यांना उर्मट उत्तरे देऊन बेशिस्तीचे दर्शन घडविल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनीही संताप व्यक्‍त करीत वाघमारे यांना खडेबोल सुनावले होते. त्यावेळी अशा अधिकार्‍यास सक्‍तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव करण्यात आला.

सदस्यांनी ठराव केला आणि सांगळे यांनी ठरावाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असले तरी प्रशासनाने मात्र त्यात फारसा रस दाखविला नाही. कोणत्याही अधिकार्‍यास सक्‍तीच्या रजेवर वा कार्यमुक्‍त करता येत नाही. त्यातल्या त्यात वाघमारे हे वर्ग एकचे अधिकारी असल्याने त्यांच्याबाबतीत नेमका काय निर्णय घ्यायचा तो सरकारच घेईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

त्यामुळेच प्रस्ताव विभागीय महसूल आयुक्‍तांमार्फत सरकारला पाठविण्यात आला आहे. सभेत झालेली चर्चा आणि ठराव याबाबतची माहितीही प्रस्तावासोबत सादर करण्यात आली आहे. दरम्यान, वाघमारे यांची विभागीय खातेचौकशी करून निलंबित करावे म्हणून यापूर्वीच म्हणजे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रस्ताव पाठविला आहे. दीपककुमार मीना यांनी यासंदर्भात सरकारला स्मरणपत्र दिले होते. हाच प्रस्ताव भिजत पडल्याने नव्याने पाठविलेल्या प्रस्तावावर सरकारकडून निर्णय होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

 

Tags : Nashik , Nashik News, Nashik ZP, Minor Irrigation Department, Chandrasekhar Waghmare, compulsory leave,