होमपेज › Nashik › छगन भुजबळ यांचे उत्स्फूर्त स्वागत

छगन भुजबळ यांचे उत्स्फूर्त स्वागत

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 10:46PMनाशिक/सिडको : प्रतिनिधी

जामिनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये आलेले माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांचे शहरात ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत दणक्यात स्वागत करण्यात आले. कारागृहातून सुटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषदेसह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राज्यातील जनतेने केलेल्या आंदोलनाचे आम्ही भुजबळ कुटुंबीय शेवटच्या श्‍वासापर्यंत उपकार विसरणार नाही, असे भावोद‍्गार आ. छगन भुजबळ यांनी यावेळी काढले.

महाराष्ट्र सदन घोटाळा तसेच बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून भुजबळ काका-पुतणे जवळपास अडीच वर्षांपासून तुरुंगात होते. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या धामधुमीत भुजबळ यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर नुकतीच समीर भुजबळ यांचीही जामिनावर सुटका करण्यात आली. खरे तर जामीन मिळाल्यानंतर भुजबळ नाशिकमध्ये कधी दाखल होणार, याकडे नेत्या-कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेच्याही नजरा लागल्या होत्या. अखेर गुरुवारी भुजबळ नाशिकमध्ये दाखल झाले असून, सार्‍यांचीच उत्सुकता संपुष्टात आली आहे. पाथर्डी फाट्यावर आगमन होताच तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण केला.

त्यावेळी सोबत आमदार पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ हेही होते. यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर लेखानगर, मुंबई नाका या ठिकाणीही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. मुंबई नाका परिसरात दीड ते दोन तास समर्थकांनी प्रतीक्षा केली. भुजबळ यांचे या ठिकाणी आगमन होताच, समर्थकांच्या चेहर्‍यावर उत्साह ओसंडून वाहत होता. पुष्पहार अर्पण करण्यासाठी समर्थकांची धडपड सुरू असताना भुजबळ यांनी वाहनात बसूनच पुष्पहार स्वीकारला. त्यानंतर गणेशवाडी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवाजी रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण केला.आज (दि.15) सकाळी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ येवल्याकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे तेथेही त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

नेत्यांची पाठ

कारागृहात असताना भुजबळ यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची रिघ लागत असे. हेच भुजबळ अडीच वर्षांनंतर नाशिकमध्ये आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, आमदार नरहरी झिरवाळ तसेच गजानन शेलार वगळता पक्षाचा अन्य एकही पदाधिकारी दिसून आला नाही. विशेष म्हणजे, मुंबईत असताना हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या भुजबळांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीही दरम्यानच्या काळात चढाओढ लागलेली दिसून आली.