Thu, Jul 18, 2019 00:04होमपेज › Nashik › नाशिकला साकारणार परीक्षा मंडळाची इमारत 

नाशिकला साकारणार परीक्षा मंडळाची इमारत 

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 1:20AMनाशिक : ज्ञानेश्‍वर वाघ

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेच्या नाशिक विभागीय मंडळाला अखेर स्वत:ची इमारत लाभणार असून, मंडळासाठी आडगाव येथील पाच एकर जागेवर 24 कोटी रुपये खर्चून तीन मजली प्रशस्त इमारत साकारण्यात येणार आहे. सध्या मंडळाचे कार्यालय वाणी हाउस इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यरत असून, त्यासाठी मंडळाला 56 लाख 40 हजार इतके भाडे वर्षाला मोजावे लागत आहे. 

जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांसाठी नाशिक येथे विभागीय परीक्षा मंडळाचे कार्यालय आहे. अत्यंत अपुर्‍या जागेत कार्यालय थाटण्यात आल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांना बसण्यासाठी पुरेशी जागाही सध्याच्या इमारतीत नाही. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी जमा होणार्‍या उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी गोदामही नाही. यामुळे या उत्तरपत्रिकाही कमी जागेतच साठवून ठेवत त्याची गोपनीयता जपण्याची तारेवरची कसरत मंडळाला करावी लागत आहे.

राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांंतर्गत नऊ विभागीय कार्यालये आहेत. त्यापैकी सध्या सात विभागीय परीक्षा मंडळांना स्वत:च्या इमारती असून, त्यात आता नाशिक मंडळाचा समावेश होणार आहे. नाशिकमधील आडगाव येथील पाच एकर जागेत 92 हजार चौरस फूट बांधकाम असलेली तीन मजली इमारत उभी राहणार आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने 24 कोटींचा निधी मंजूर केला असून, गेल्या महिन्यात 28 तारखेला बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता येत्या महिन्याभरात या इमारतीचे बांधकाम सुरू  होऊन इमारतीचा पाया रचला जाणार आहे. इमारतीसाठी नाशिक विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, मंडळाचे सचिव आर. आर. मारवाडी तसेच सहसचिव कदम यांचा पाठपुरावा सुरू आहे.