Sat, Jul 20, 2019 15:23होमपेज › Nashik › शतकानंतरही ‘मल्लखांब’ला मिळेना राजाश्रय

शतकानंतरही ‘मल्लखांब’ला मिळेना राजाश्रय

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 10:50PMनाशिक : प्रतिनिधी

मल्लखांब.. एक चित्तवेधक आणि शारीरिक कसरतींनी प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारा खेळ! नाशिकमधून सुरुवात झालेल्या आणि जिल्ह्यातील गत चार पिढ्यांनी शतकभरापासून परंपरा टिकवून ठेवलेला मल्लखांब आजही शासनदरबारी उपेक्षितच आहे.या खेळाला अद्यापही राजाश्रय मिळालेला नाही. या खेळाची लोकप्रियता वाढावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात नाहीत. विशेष म्हणजे नाशिक महापालिकेकडून आयोजित होणार्‍या महापौर चषक स्पर्धेतही या खेळाचा समावेश नाही, ही एक शोकांतिका असल्याची भावना मल्लखांबप्रेमी आणि खेळाडूंनी बोलून दाखवली.

नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंग गड येथील    श्री सप्तशृंगगडावरील बाळभट्ट देवधर यांनी मल्लखांब या खेळाचा शोध लावल्याचे इतिहासातील काही संदर्भांमधून स्पष्ट होते. ज्या बाळभट्टांनी या खेळाचा शोध लावला त्यांच्याच जिल्ह्यात या खेळाची उपेक्षा होत आहे. नाशिकमधली एकटी यशवंत व्यायामशाळा सोडली तर कुणाकडूनही या खेळाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. यासाठी सर्वप्रथम सुरुवात महापालिकेकडून व्हावी, अशी अपेक्षा खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून व्यक्‍त केली जात आहे.

मराठी शाळांचे दुर्लक्ष; इंग्रजी शाळांकडून मात्र स्वागत

स्थानिक पातळीवर मल्लखांबची लोकप्रियता वाढवण्यासाठी फ्रावशी अकॅडमीसारख्या इंग्रजी शाळांकडून विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब हा खेळ आणि व्यायाम प्रकार म्हणून निवडला जात आहे. नंतर याचवेळी मोठ्या प्रमाणावर असलेल्या मराठी शाळा मात्र मल्लखांबकडे साफ दुर्लक्ष करताना दिसतात. मल्लखांब करणे आणि शिकवणे सोपे नाही, हे पीपीएड झालेले शिक्षक चांगलेच जाणून आहेत. त्यामुळेच क्रीडा शिक्षकसुद्धा सोप्या खेळांकडे जातात.