Wed, Nov 21, 2018 13:17होमपेज › Nashik › अतिक्रमण निर्मूलनात हातगाडीधारकच ‘टार्गेट’

अतिक्रमण निर्मूलनात हातगाडीधारकच ‘टार्गेट’

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 27 2018 11:54PMपंचवटी : वार्ताहर

पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने परिसरात अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, या मोहिमेत अनेक ठिकाणी हातगाडीधारकांनाच टार्गेट केले जात असून, पक्क्या बांधकाम केलेल्या टपर्‍यांना अभय दिले जात असल्याने यामागचे नेमके कोणते कारण आहे. याबाबत असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

परिसरात सुरु असलेल्या अतिक्रमण मोहिमेत अनेक स्पॉटकडे कर्मचार्‍यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. गंगाघाटावर वर्षातून आठ दहा दिवसांसाठी गोवर्‍या विकण्यासाठी येणार्‍या आदिवासी बांधवांना येथून अधिकारी हाकलून लावत आहेत. तर समोरच वाळूचे ठिय्ये लावून बसलेल्या अतिक्रमणधारकांना मात्र, जावयासारखी वागणूक देऊन त्यांच्यावर मेहेरबानी केली जात आहे.

त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त पदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी घेताच त्यांनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना चांगलेच कामाला लावले आहे. त्यात काही अधिकारी आपण किती चांगले काम करीत आहोत हे दाखविण्यासाठी थेट गरिबांच्या घरावर आणि रोजीरोटीच्या साहित्यावर बुलडोझर फिरविण्यास मागे पुढे पाहत नसल्याचा प्रत्यय पंचवटीकरांना अनुभवायला मिळत आहे. 

पंचवटी विभागीय अधिकारी बी. वाय. शिंगाडे यांनी सध्या पंचवटीमध्ये अतिक्रमण मोहीम  (सामान्य हातगाडीधारकांसाठीच) हाती घेतल्याची भावना सामान्यांची झाली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गोदावरी नदीच्या पाहणी दौर्‍यात वाळू विक्रेत्यांची वाळू जप्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, यांना अधिकार्‍यांकडून अभय मिळत आहे तर बाजूलाच बेघरांच्या तंबुवर बुलडोझर फिरविला जात आहे. इतकेच नव्हे तर होळीच्या निमित्ताने गौरी पटांगणात आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने आठदहा दिवसांसाठी गोवर्‍या विकण्यासाठी येत असतात. त्यांना देखील येथून हाकलून लावले जात आहे. या सर्व प्रकारामुळे  शहरात दोन पैसे मिळविण्यासाठी आलेल्या आदिवासी बांधवांचे आर्थिक नुकसान होत आहे. तर त्यांनी वर्षभरापासून तयार केलेल्या गोवर्‍या कुठे जाऊन विकाव्या हा प्रश्‍नही या कारवाईमुळे त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

विभागीय अधिकारी यांनी अतिक्रमण काढताना कोणत्याच नियमांची पूर्तता केलेली दिसत नाही. पेठरोड परिसरातील आरटीओ कार्यालयाच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये चार ट्रक, दोन अधिकार्‍यांची आणि पोलिसांची वाहने पाच पन्नास कर्मचारी घेत अतिक्रमण काढण्याचे सोपस्कार केले आहेत. यात आरटीओ कार्यलयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पक्क्या टपर्‍यांना अभय देत  दोन टपर्‍यांच्या मधील हातगाडी उचलण्याची किमया केली आहे. तसेच, रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या आणि मनपाचा ठराव करून लावलेल्या हातगाडीवरही  कागदपत्रे दाखवूनही कारवाई केली आहे. यावेळी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिक्रमणावेळी शिंगाडे याना बोलण्यासाठी वाहनातून खाली येण्याची विनंती केली. मात्र, मी तुमच्याकडे कामाला नाही असे सांगत निघून गेले.