Sun, Apr 21, 2019 04:17होमपेज › Nashik › गायीचे शेण, गोमूत्र यापासून पर्यावरणपूरक कुंडीची निर्मिती

गायीचे शेण, गोमूत्र यापासून पर्यावरणपूरक कुंडीची निर्मिती

Published On: Mar 01 2018 1:31AM | Last Updated: Feb 28 2018 11:31PMपंचवटी : वार्ताहर 

प्लास्टिकचा वाढता बेसुमार वापर आता धोकादायक ठरू लागला आहे. कचरा कुंडीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात प्लास्टिकचा कचरा फेकलेला दिसून येतो.  हेच प्लास्टिक संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू लागले आहे. यासाठी इंजिनिअर असलेल्या सत्यजित शहा यांनी गायीचे शेण आणि गोमूत्र यापासून पर्यावरणपूरक कुंडी आणि धूप तयार केला आहे. 

सध्या नर्सरीमध्ये नवीन रोप बनवायला पारंपरिक पद्धतीने प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात. याच पिशव्या इतरत्र फेकून दिल्या जातात. यावरच एक उपाय म्हणून नाशिकच्या ऊर्जा गौ संवर्धन आणि संशोधन केंद्रातर्फे देशी गायीच्या शेणापासून झाडांच्या कुंड्या तयार करण्यात आल्या आहेत. गायीचे शेण एक सर्वोत्तम खत आहे. हे सर्वश्रुत आहे पर्यावरण पूरक अशी इको फ्रेंडली झाडांची कुंडी बनविण्यात आली आहे. औरंगाबाद रोडवरील नांदूरनाका येेथे असलेल्या ऊर्जा गौसंवर्धन आणि संशोधन केंद्र येेथे या पर्यावरणपूरक कुंड्या तयार करण्यात आल्या आहेत. हिरव्यागार नर्सरी जितक्या दिसायला सुंदर असतात तितक्याच प्रमाणात धोकादायक प्लास्टिकही जमा होत असते पर्यायाने प्रदूषण वाढत असते. यावर उपाय म्हणून कुंड्या बनविण्यात येत आहेत.

तसेच घरात ठेवण्यासाठी सुंदर अशा विविध आकारातही कुंड्या बनवण्यात येत आहेत. या  कुंड्या गायीच्या शेणापासून बनविलेल्या असल्या तरीही त्या ठिसूळ नाहीत. शेणापासून कुंडी बनविण्यासाठी संपूर्ण नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. कुंडीला कीड लागू नये म्हणून कडुनिंवाचा पाला, गौमूत्र एकत्र करून पूर्णपणे नैसर्गिकरित्या कुंडी बनविण्यात आली आहे. नर्सरीसाठी छोट्या कुंड्या तर घरी वापरासाठी मोठ्या आकाराच्या कुंड्या नाममात्र दरात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या कुंड्या बाजारात मिळणार्‍या प्लास्टिकच्या किंवा मातीच्या कुंड्यांप्रमाणेच आकर्षक असून 20 रुपयांपासून या कुंड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

वर्षभरापासून शेणापासून विविध वस्तू बनविण्याचे प्रयोग करीत शेवटी या कुंड्या बनविण्यात यश आले असल्याचे संचालक सत्यजित शहा यांनी सांगितले. तसेच शेण व गौमूत्र यापासून धुप बनविण्यात आला आहे. हा धुप पूर्णपणे नैसर्गिक आहे. यामध्ये विविध हवन सामग्री, गायीचे तूप, गौमूत्र, शेण असे एकत्रित मिश्रण तयार करून बनविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अजूनही भरपूर पर्यावरणपूरक विविध वस्तू शेणापासून बनविण्यात येणार असून त्याबाबत प्रयत्न सुरु आहे. सत्यजीत शाह हे  इंजिनिअर असून पर्यावरणासाठी पाऊल उचलावे  आणि काही वेगळे करण्याच्या प्रयत्नातून गोसेवा करत हा छंद जोपासला आहे. त्यांचे वडील अरुण शाह हे गोप्रेमी होते व त्यांचा वारसा पुढे चालवू गोसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.