Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Nashik › कार झाडावर आदळून उद्योजक पाटील यांचा मृत्यू 

कार झाडावर आदळून उद्योजक पाटील यांचा मृत्यू 

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:47PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

येथील प्रसिध्द उद्योजक रणजित पाटील (52, रा. कॅनडा कॉर्नर)  यांचा महात्मानगर पारिजातनगर परिसरात कार झाडावर आदळून दुर्दैवी मृत्यू झाला.

सोमवारी (दि.8) रात्री हा अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मंगळवारी दुपारी त्यांचे निधन झाले. गुरुवारी (दि.11) सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

पाटील हे कारने (एमएच 18 व्ही 1038) महात्मानगरकडून जेहान सर्कलच्या दिशेने जात होते. त्यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पारिजातनगर येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. जोरदार धडक बसल्याने पाटील यांना गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्योजक पाटील हे डांबर पुरविणार्‍या व्यापारी आणि वाहतूकदारांच्या  संघटनेचे सदस्य होते. त्यांच्या निधनाबद्दल असोसिएशनच्या राज्य शाखेने तसेच अखिल भारतीय संघटनेने दु:ख व्यक्त केले आहे. पाटील यांचा परिवार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आहे. त्यांच्या पश्‍चात आई, वडील डॉ. भालचंद्र उर्फ बी.यू. पाटील, थोरले बंधू डॉ. मनोज, कमर्शिअल आर्टिस्ट पत्नी अनुपमा, तसेच अमेरिकेत शिकणार्‍या मुली वृध्दी आणि रुतिका असा परिवार आहे.