Sat, Apr 20, 2019 10:02होमपेज › Nashik › एमराल्ड स्कूलची मान्यता  रद्द  होणार 

एमराल्ड स्कूलची मान्यता  रद्द  होणार 

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 08 2018 11:28PMनाशिक : प्रतिनिधी

शिक्षण हक्‍क कायद्याचे पालन न करणे आणि विद्यार्थ्यांचा शारिरीक छळ केल्याचा ठपका ठेवत नाशिकरोड येथील एमराल्ड हाईटस पब्लिक स्कूलची मान्यता तत्काळ रद्द करण्याची शिफारस मनपा शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे केली आहे. शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे मनमानी कारभार करून विद्यार्थी व पालकांचा आर्थिक व मानसिक छळ करणार्‍या शिक्षण संस्थांना दणका बसला आहे. 

गृहपाठ न केल्याप्रकरणी तीन दिवसांपूर्वी एमराल्ड हाईटस शाळेच्या मुख्याध्यापिका तथा संंस्थाचालिका जयश्री रोडे यांनी शाळेतील इयत्ता तिसरीतील ग्रंथाली बोंडे व इयत्ता 5 वीतील ओम भोईटे या विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. पालकांनी शाळेने विद्यार्थ्यांचा शारिरीक छळ केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तसेच शिक्षण मंडळाकडेही तक्रार नोंदविली होती. त्यानुसार शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी केंद्रप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या पथकाने 7 फेब्रुवारी रोजी शाळेला भेट देऊन चौकशी केली. तसेच उपासनी यांनी देखील शाळेला 8 फेब्रुवारी रोजी दुपारी भेट देऊन चौकशी अहवालाची पडताळणी केली असता अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. संबंधित पालकांशी प्रशासनाधिकार्‍यांनी संवाद साधला असता शुल्क उशिरा देण्याच्या कारणावरून तसेच अभ्यास न केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना उन्हात उभे करणे, वर्गाबाहेर उभे करणे, परीक्षेला बसू न देणे, पालकांना धमकावणे, शाळेच्या बाहेर काढणे, विद्यार्थ्यांना मारहाण करणे यासारखा त्रास शाळा व्यवस्थापनाकडून दिला जात असल्याचे जबाब दिले आहेत. त्याचबरोबर शाळेला भेट दिली असता शाळेतील मुले भयभीत आढळून आल्याचे नितीन उपासनी यांनी शिक्षण उपसंचालकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.  शाळेच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यात शाळा शिक्षण हक्‍क कायद्यातील कुठल्याही निकषांचे व नियमांचे पालन करत नसल्याची बाब निदर्शनास आली. शाळेला पुरेशी इमारत व वर्ग खोल्या नाहीत. शिक्षक व मुख्याध्यापकांना मान्यता न घेताच रूजू करून घेतले आहे. शाळेसाठी क्रीडांगण नाही. अग्‍निशमन सुरक्षेची व्यवस्था नाही तसेच प्रशिक्षित शिक्षक व मुख्याध्यापक नसल्याच्या बाबी चौकशीत आढळून आल्याचे उपासनी यांनी म्हटले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता शाळेची शासन मान्यता तत्काळ काढून घ्यावी, अशा स्वरूपाची शिफारस करण्यात आली आहे.

आनंदऋषी शाळेची आज चौकशी 

दरम्यान, एमराल्ड शाळेप्रमाणेच नाशिकरोडमधील जयभवानी रोडवरील आनंदऋषी या शाळेच्या कारभाराचीही मनपा शिक्षण मंडळाकडून आज (दि.9) चौकशी करण्यात येणार आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांना मान्यता नसणे, व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार होणे यासह विविध कारणांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.

संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकांना चौकशीसाठी बोलविले होते. त्या हजर राहिल्या नाही. आज (दि.9) पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलविले असून, हजर न राहिल्यास शाळेविरूध्द शिक्षण विभाग गुन्हा दाखल करून कारवाई करेल. 
- रामचंद्र जाधव,
शिक्षण उपसंचालक