Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Nashik › कृषिपंपांची १२७ कोटींची थकबाकी

कृषिपंपांची १२७ कोटींची थकबाकी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यात कृषी पंपांच्या वीज बिल थकबाकीचा आकडा मोठ्या प्रमाणावर फुगलेला दिसून येतोे. वीज वितरण कंपनीच्या विभाग एकमध्ये (शहर) 40 कोटी 86 लाख 83 हजार 597 तर विभाग दोनमध्ये (ग्रामीण) 85 कोटी 96 लाख 5 हजार 256 रुपये अशी सुमारे 127 कोटी रुपयांची कृषी पंपांची थकबाकी आहे. तथापि, राज्यातील कृषी पंपाच्या वीज बिल वसुली राज्य शासनाने स्थगित केल्याने तालुक्यातील 30 हजार 837 शेतकर्‍यांना वसुलीच्या तगाद्यापासून तूर्त दिलासा मिळाला आहे.

आर्थिक वर्षाअखेरीस वीज वितरण कंपनीकडून वीज बिलांसाठी शेतकर्‍यांना तगादा लावला जातो. शेतमालाचे गडगडलेले भाव, त्यातच राज्याच्या काही भागात बोंडअळीने पिके उद्ध्वस्त झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या  शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी  सरकारने कृषिपंपांच्या वीज बिल वसुली स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तालुक्यातील 30 हजारावर शेतकर्‍यांच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब ठरली आहे.

यात अधिकृतरित्या आकडा टाकून वीज कनेक्शन घेतलेले आणि वीज मीटर घेतलेले अशा दोन्ही प्रकारच्या शेतकर्‍यांचा समावेश आहे. अनधिकृतरित्या आकडा टाकून वीज घेणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून आले. यात वीजचोरी तर व्हायचीच पण, रात्री-अपरात्री वीज जोडणी करताना शेतकर्‍यांचे अपघातदेखील घडले. त्यामुळे कंपनीने महावितरण आपल्या दारी योजना राबविली. त्यात सिन्नर ग्रामीण विभागातील ग्राहकांची संख्या 8 हजार 939 इतकी झाली.

अशा शेतकर्‍यांना तीन महिन्यांसाठी 2 हजार 636 रुपयांची वीज बिल आकारणी केली जाते. याच विभागात मीटर धारक शेतकर्‍यांची संख्या दहा हजार असल्याचे सांगितले जाते.  सिन्नर शहर विभागात एकूण कृषिपंप वीज ग्राहकांची संख्या 11 हजार 898 इतकी आहे. मध्यंतरी उर्जामंत्र्यांनी नाशिकरोड येथे बैठक घेऊन शेतकर्‍यांना कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सप्टेंबर 2017 वीज बिल पूर्ण भरायचे आणि दंड, व्याज माफ करुन उर्वरित थकबाकी असलेल्या रकमेचे पाच हप्ते संबंधित शेतकर्‍यांनी भरायचे अशी ही योजना ठरविण्यात आली होती. मात्र, या योजनेला तालुक्यात अल्प प्रतिसाद लाभल्याचे वीज अधिकार्‍यांकडून सांगण्यात येते.

अद्याप परिपत्रक नाही

राज्य शासनाने राज्यातील कृषिपंप वीज बिल वसुली स्थगित केली असली तरी याबाबतचे परिपत्रक मात्र, वीज वितरण कंपनीला मिळालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ विभागीय कार्यालयात याबाबतच्या बैठका घेऊन वरिष्ठांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे कृषिपंपांची वीज बिल वसुली किती दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेली आहे. याबाबत संभ्रम आहे. तरीदेखील शक्य होत असेल, अशा शेतकर्‍यांनी वीज बिल भरणा करुन वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन वीज वितरणच्या अधिकार्‍यांकडून केले जात आहे.

 

Tags : Sinnar, Sinnar news, agricultural pump, Electricity, Electricity bill,


  •