Mon, Apr 22, 2019 15:46होमपेज › Nashik › नाशिक शिक्षक मतदारसंघाची २५ जूनला निवडणूक

नाशिक शिक्षक मतदारसंघाची २५ जूनला निवडणूक

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 11:47PMनाशिकरोड/ उपनगर : वार्ताहर

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, सोमवारी (25 जून) सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान होणार आहे. दि 28 जून रोजी मतमोजणी होणार आहे. दि. 24 मेपासून मतदारसंघातील नाशिकसह, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती उपायुक्त रघुनाथ गावले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागाचे आयुक्त राजाराम माने यांची निवड करण्यात आली आहे. तर विभागाचे सर्व जिल्हाधिकारी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात 39 हजार 624 पुरुष, तर 12 हजार 577 स्त्री मतदारसंख्या असून, एकूण 52 हजार 201 मतदार आहेत. 94 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोग स्वतंत्र निवडणूक निरीक्षक नेमणार आहेत.

आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना शासकीय वाहने वापरता येणार नाही, त्याचप्रमाणे मंत्री महोदयांना शिक्षकांच्या उपयुक्त कोणत्याही घोषणा करता येणार नाही, शैक्षणिक संस्थेच्या शाखेचे उद्घाटन अथवा विनापरवानगीने उमेदवारांनी फलक लावू नयेत अशा सूचना देण्यात आल्या असून, त्याचा भंग झाला तर गुन्हा दाखल होईल, असा इशारा दिला.