Thu, Jun 27, 2019 16:50होमपेज › Nashik › खडसे यांना भांडण्याची सवयच; गिरीश महाजन यांचा चिमटा

खडसे यांना भांडण्याची सवयच; गिरीश महाजन यांचा चिमटा

Published On: Feb 25 2018 3:50PM | Last Updated: Feb 25 2018 3:50PMनाशिक : प्रतिनिधी

माजी मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भांडण्याची सवय आहे. मंत्रिमंडळात नसले, तरी ते भांडतात. त्यांचा तो स्वभावच आहे. एवढेच नव्हे, अनेक वर्षे विरोधी पक्षात काढल्याने आम्हालाही अद्याप सत्तेत असल्यासारखे वाटत नाही. विधानसभेत विरोधी पक्षांचे नेते आम्हाला त्याची आठवण करून देतात, अशी मिश्किली राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. 

नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार महाजन यांना रविवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत महाजन यांनी अनेक विषयांवर दिलखुलास मते मांडली. आपण जळगावकडेच अधिक लक्ष देता, नाशिककडे दुर्लक्ष करता, या प्रश्ना वर उत्तर देताना ते म्हणाले की, अशीच ओरड जळगावकरांचीही आहे. जळगाव हा माझा जिल्हा, माझी कर्मभूमी आहे. एकनाथ खडसे हे मंत्री असताना, आम्ही दोघे मिळून जळगावकडे लक्ष देत होतो. मात्र, आता खडसे काही कारणाने मंत्रिमंडळात नसल्याने आपल्याकडून तेथील कामांचा पाठपुरावा सुरू आहे. 

गेल्या चार-पाच महिन्यांपासून  थांबलेल्या कामांना गती दिली जात आहे. खडसे मंत्रिमंडळात नसले, तरी ते जळगावकडे लक्ष देत असतात, तिथल्या कामांसाठी भांडतात. तेथील डॉक्टरांच्या प्रश्नां वरून तर त्यांनी उपोषणच केले होते. ते जरा अधिकच भांडत असले, तरी भांडणे हा त्यांचा स्वभाव व स्थायीभावच आहे. आम्ही अनेक वर्षांपासून विरोधी पक्षात राहिल्याने अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटत नाही. विधानसभेत अनेकदा आक्रमक बोलण्यासाठी आमचा बोट वर जातो, तेव्हा विरोधी पक्षांचे नेते ‘तुम्ही सत्तेत आहात, विरोधक नव्हे, भांडू नका’ अशी आठवण करून देतात, असेही महाजन म्हणाले.

प्रमोशन नको!

मंत्रिमंडळात तुम्हाला लवकरच प्रमोशन मिळण्याची चर्चा असल्याचे विचारताच, महाजन यांनी ‘आहे त्या खात्यावर मी समाधानी असून,  मला अशी काही चर्चा चिकटवू नका आणि असा विचारही माझ्या डोक्यात घालू नका’, असे म्हणत या चर्चेवर पडदा टाकला.