होमपेज › Nashik › समृद्धी प्रकल्पासाठी अठरा कंपन्या पात्र 

समृद्धी प्रकल्पासाठी अठरा कंपन्या पात्र 

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 11:56PMनाशिक : प्रतिनिधी

मुंबई-नागपूर समृद्धी प्रकल्पासाठी तांत्रिक पातळीवर 18 कंपन्या पात्र ठरल्या असून, याबाबतचे पत्रक बुधवारी (दि. 23) प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये अशोका बिल्डकॉन, एल अ‍ॅण्ड टी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर, टाटा प्रोजेक्टस् या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी हा राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा आहे. 712 किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी दहा जिल्ह्यांमधील जमीन अधिग्रहणाचे काम वेगाने सुरू आहे. राज्यात सद्यस्थितीत 60 टक्क्यांच्या आसपास अधिग्रहण पूर्ण झाले असून, नाशिक जिल्ह्याची टक्केवारी 69 च्या आसपास आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने निविदा बोलविल्या होत्या. या निविदांमध्ये 18 कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या कंपन्यांची नावे ही बुधवारी प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाला येत्या काळात अधिक गती मिळणार आहे. 

समृद्धी प्रकल्पाला राज्यभरातून विरोधाची धार होती. विशेष करून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिवडे हे विरोधाचे केंद्रबिंदू ठरले होते. त्यामुळे प्रकल्पावरून सरकारची डोकेदुखी वाढली होती. मात्र, गेल्या आठवड्यात शिवडेतील संयुक्त मोजणीचे काम पूर्ण करत जिल्हा प्रशासनाने गावातील जमीन अधिग्रहण सुरू केले आहे. त्यामुळे समृद्धीच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. 

सरकारने प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. पुढील महिन्यात नागपूरमधून प्रकल्पाच्या भूमिपूजनाचे  कुदळ मारण्यासाठी सरकार उत्सुक आहे.