Fri, Aug 23, 2019 15:44होमपेज › Nashik › नाशिक : विजेच्या तारेतून गोठ्यात करंट उतरुन आठ म्हशींचा मृत्यू

नाशिक : विजेच्या धक्‍याने आठ म्हशींचा मृत्यू

Published On: Mar 18 2018 1:05PM | Last Updated: Mar 18 2018 1:05PMपंचवटी (नाशिक), वार्ताहर : देवानंद बैरागी 

पंचवटी परिसरातील औरंगाबाद रोडवरील सिद्धिविनायक लॉन्स शेजारी असलेल्या म्हशीच्या गोठ्यावर वीजेची तार पडून आठ म्‍हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महावितरण वीज कंपनीची गोठ्यावरुन गेलेली वायर तुटल्यामुळे ही घटना घडली. 

या अपघातात याठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना कोणतीही इजा झाली नाही. एका म्हशीची जागा रिकामी असल्याने पुढे बांधलेल्या इतर म्हशी वाचल्या आहेत. या घटनेत गोठे मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आज (रविवार १८ मार्च) सर्वत्र गुढी पाडव्याचा सण मोठ्या धुमधामीमध्ये सुरु असताना दुसरीकडे औरंगाबाद रोडवरील पवन साहेबराव लोहट यांच्या मालकीच्या पवन दूध डेअरी येथे विजेच्या तारांचा शॉक लागून आठ म्हशींचा मृत्यू  झाला आहे. 

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या गोठ्यावरून वर्षभरापूर्वी विजेची वायर टाकली होती. त्यावेळी पवन लोहट यांनी वायर टाकण्यास विरोध केला होता. तरी देखील वीज कर्मचाऱ्यांनी वायर म्हशींच्या गोठयावरून टाकली. वायर टाकताना योग्य काळजी न घेतल्याने तसेच वायर गोठ्यावरील लोखंडी पत्र्यांना घासली जात असल्याने वायरवरील आवरण निघून विद्युत तारांचा संपर्क लोखंडी पत्र्यांशी आला. पत्र्यांचा करंट गोठ्यामध्ये बांधलेल्या म्हशींच्या गळ्यातील लोखंडी साखळीत उतरून एकमेकांना चिकटून उभ्या असलेल्या आठ म्हशींचा शॉक लागून मृत्यू झाला              

या गोठयामध्ये जवळपास १०० म्हशी बांधलेल्या होत्या. त्यामध्ये ५०-५० म्हशींच्या दोन लाईन करण्यात आल्‍या होत्‍या. एका रांगेत असलेल्या ५० म्हशींच्या रांगेत या मृत्युमुखी पडलेल्या आठ म्हशीनंतर एका म्हशींची जागा रिकामी असल्याने पुढील इतर म्हशींना विजेचा करंट लागला नाही आणि त्यात त्या बचावल्या. याठिकाणी गोठ्यात जवळपास आठदहा मजूर काम करतात. दैव बलवत्तर म्हणून ते या विजेच्या करंट पासून बचावले.  याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडून जीवित हानी झाली असती असा आरोप पवन लोहट यांनी केला आहे.

मृत्युमुखी पडलेल्या एका म्हशींची किंमत जवळपास दीड लाख रुपये असून, या घटनेत  पवन लोहट यांचे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच स्थानिक आमदार, नगरसेवक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी देखील केली.

Tags : Beefalo, Mahavitran, Nashik, Panchwati,Mahavitran Careless Work ,Electric Shock Incident