Fri, Nov 22, 2019 23:29होमपेज › Nashik › इजिप्तचा कांदा खातोय भाव

इजिप्तचा कांदा खातोय भाव

Last Updated: Nov 09 2019 2:04AM
लासलगाव : वार्ताहर
लासलगाव बाजार समिती इजिप्तच्या काळपट लालसर कांद्याला बाजारभावाची लाली चढली आहे. एका व्यापार्‍याने इजिप्त येथून आयात केलेल्या कांद्यातील शिल्लक राहिलेला तीस क्‍विंटल कांदा दोन वाहनांतून विक्रीसाठी आणला होता. त्या कांद्याला जास्तीत जास्त 3,636 रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला.

इजिप्तच्या कांद्याला जरी बाजारभाव मिळाला असला तरी त्या कांद्याचा कलर आणि चव भारतीय कांद्यापुढे फिक्‍का असल्याने भारतीय कांद्यालाच देशासह इतर देशांत मागणी असल्याचे बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.त्यातील एका वाहनाला 3,636 रुपये प्रतिक्‍विंटलला बाजारभाव मिळाला. तर दुसर्‍या वाहनातील कांद्याला 3,590 रुपये प्रतिक्‍विंटलला बाजारभाव मिळाला.

देशांतर्गत वाढलेली कांद्याची मागणी, त्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांदा बाजारभावात दररोज चढ-उतार होत होता. लासलगाव बाजार समितीत 341 वाहनांतून उन्हाळ कांद्याची 3,619 क्‍विंटलची आवक झाली होती. त्याला जास्तीत जास्त 5,301 रुपये, सरासरी 4,740 रुपये तर कमीत कमी 2,300 रुपये प्रतिक्‍विंटलला बाजारभाव मिळाले.

17 वाहनांतून लाल कांद्याची 190 क्‍विंटलची आवक झाली होती. त्याला जास्तीत जास्त 3,939 रुपये, सरासरी 3,000 रुपये, तर कमीत कमी 1,950 रुपये प्रतिक्‍विंटल बाजारभाव मिळाला.