Mon, Aug 19, 2019 07:42होमपेज › Nashik › भक्‍तांसाठी इकोफ्रेंडली ‘गो ग्रीन बाप्पा’

भक्‍तांसाठी इकोफ्रेंडली ‘गो ग्रीन बाप्पा’

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 11:23PMसायखेडा : वार्ताहर

प्लास्टिकबंदी नंतर आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींकडे आता लक्ष वेधले आहे. पर्यावरणविषयक जाणीव सर्व स्तरांतून निर्माण व्हावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, म्हणून ‘गो ग्रीन बाप्पा’ या इकोफ्रेंडली गणेश मूर्तीचे तसेच वेबसाइट व लोगोचे अनावरण राज्याचेे वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

बहुतेक गणेशोत्सव मंडळ, घरातही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी इच्छा अनेकांची असते.पण, अशावेळी त्यांना त्यातही योग्य पर्याय कोणता निवडावा हा प्रश्‍न सतावतो. म्हणूनच या प्रश्‍नावर उत्तर म्हणून सोनाली कुंभार यांनी मूर्तिकार शुभम कुंभार यांच्या कलाकृतीतून ‘गो ग्रीन बाप्पा’ ही संकल्पना आणली आहे. मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी या इकोफ्रेंडली गणेशमूर्तीचे तसेच वेबसाईट व लोगोचे अनावरण करण्यात आले. गणेशभक्‍तांनी यावर्षी आपल्या घरी ग्रीन बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गणपतीची मूर्ती लाल माती, शेणखत व कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली आहे. मूर्तीसह आपणास फळभाज्यांच्या बिया देण्यात येणार असून, मूर्तीचे विसर्जन घराच्या घरीच करून मूर्तीसह देण्यात आलेल्या बिया कुंडीत टाकून त्यातून आपणास बाप्पारूपी रोप तयार होईल. सध्या पर्यावरणास प्लास्टर ऑफ पॅरिसचा फार मोठा धोका निर्माण होत आहे. यातूनच पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक बाप्पा ही संकल्पना निर्माण झाली. सर्वांच्या सहकार्याने यावर्षीपासून गो ग्रीन बाप्पा हा आमचा संकल्प आहे. या संकल्पनेचे सर्व स्तरातून नक्‍कीच स्वागत होईल, अशी अपेक्षा तसेच ग्रीन बाप्पा संकल्पना साध्य होईल असे मत सोनाली कुंभार यांनी व्यक्‍त केले.