Fri, Apr 26, 2019 15:33होमपेज › Nashik › ई कचर्‍यासाठी कलेक्शन सेंटर उभारणार

ई कचर्‍यासाठी कलेक्शन सेंटर उभारणार

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 12:02AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाकडून कचरा डेपोवर विविध उपाययोजना केल्या जात असताना इ-कचर्‍याची समस्याही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी मनपाने ई वेस्ट कलेक्शन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, अशा स्वरुपाच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 

मनपाच्या सुमारे 137 घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरासह परिसरातील घराघरातील कचर्‍याचे संकलन केले जात आहे. त्याचबरोबर उद्याने, रस्त्यावरील कचर्‍याचेही संकलन करून कचरा डेपोवर त्याची विल्हेवाट लावली जात आहे. शहरातून दररोज सुमारे चारशे ते साडेचारशे टन कचरा संकलित केला जातो. या कचर्‍याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच इ कचर्‍याचाही प्रश्‍न निर्माण होत आहे.

शहराचा वाढता विस्तार व इलेक्ट्रॉनिकसह इतरही विद्युत उपकरणांचा कचराही निर्माण होत आहे. मात्र, आजमितीस अशा प्रकारच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाकडे कुठलीही यंत्रणा नाही. भंगार फ्रीज, टीव्ही, संगणक, कीबोर्ड, विविध प्रकारचे कॅमेरे, सीडी यासह विविध विद्युत उपकरणांचा या कचर्‍यात समावेश होतो. आजमितीस या भंगार इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमतही अगदी नगण्य झाल्याने या वस्तू कोणी विकत घेण्यासह धजावत नाही.

यामुळे शहरात विविध ठिकाणी अशा वस्तू फेकून दिल्या जातात. यामुळे भविष्यात अशा वस्तुंमुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन मनपाने इ वेस्ट कलेक्शन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेकून दिलेल्या या वस्तंमुळे पर्यावरणाचाही प्रश्‍न निर्माण होत आहे. यामुळे इ-वेस्ट व्यवस्थापन कायद्यानुसार मनपाने राज्य शासनाच्या आदेशानुसार इ-कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील सहाही विभागात कलेक्शन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या कलेक्शन सेंटरमध्ये जमा होणार्‍या वस्तू पुन्हा पुरवठादार तसेच विक्रेत्यांना पुनर्वापरासाठी दिल्या जाणार आहेत. त्याकरता वेगळी यंत्रणा उभी केली जाणार असून, अशा वस्तुंची विल्हेवाट लावणार्‍या संस्थांमार्फत हे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे मनपाच्या प्रस्तावात म्हटले आहे.