Wed, Jul 17, 2019 08:00होमपेज › Nashik › संप चिघळण्याच्या धास्तीने शेतमालाची आवक वाढली

संप चिघळण्याच्या धास्तीने शेतमालाची आवक वाढली

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 12:51AMनाशिक : प्रतिनिधी

शेतमाल व दुधाला हमीभाव द्यावा, शेतकरी कर्जमुक्त करावा या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेला संप अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या शेतकर्‍यांनी मंगळवारी (दि. 5) बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मालविक्रीसाठी आणला. परिणामी आवक वाढल्याने शेतमालाचे दर घसरले. दरम्यान, बाजार समित्यांमध्ये बुधवारी (दि. 6) आवक चांगली झाल्यास शेतमालाचे भाव आणखीन घसरण्याची शक्यता आहे. 

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर राष्ट्रीय किसान महासंघाने 1 जूनपासून देशव्यापी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातही या संपाला पाठिंबा मिळाला. परंतु, पाच दिवस लोटले तरी सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच या पुढील टप्यात संप अधिक तीव्र करण्याची तयारी संपकरी संघटनांनी केली आहे. येत्या गुरूवारपासून मुंबई-पुणे-नाशिकसह औरंगाबाद, नागपूर तसेच इतर मोठ्या शहरांची रसद तोडण्याची तयारी संघटनांनी केली आहे. यावेळी एकही भाजीपाल्याचे वाहन तसेच दुधाचा टँकर शहरापर्यंत पोहचू देणार नसल्याचे संघटनांनी सांगितले आहे. 

संपाची ही तिव्रता बघता जिल्हा प्रशासनाने नाशिकमधील 17 ही बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून (दि. 4) पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे सोमवारी 17 पैकी 10 बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक चांगली झाली. तसेच, दुधाचेही 100 टक्के संकलन झाले. दरम्यान, मंगळवारीही सर्व बाजार समित्यांचे कामकाज मंगळवारी सुरळीत सुरू होते. दरम्यान, संपकाळात माल बाजारात विक्रीसाठी आणता येणे शक्य होणार नाही. परिणामी शेतातच मालाची नासाडी होउन त्यातुन नुकसानच सोसावे लागेल. त्यामुळेच या भितीपोटी शेतकर्‍यांनी समित्यांमध्ये माल विक्रीसाठी घेऊन आले होते. त्यामुळेच बाजार समित्यांच्या आवारात लगबग दिसून आली.