Tue, May 26, 2020 22:05होमपेज › Nashik › गुजरात : सरदार सरोवर धरणाचे २३ दरवाजे उघडले, पूराचा धोका वाढला

गुजरात : सरदार सरोवर धरणाचे २३ दरवाजे उघडले, पूराचा धोका वाढला

Published On: Sep 10 2019 4:49PM | Last Updated: Sep 10 2019 4:40PM
नंदुरबार : प्रतिनिधी

मध्यप्रदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे नर्मदेला महापूर आला असून, महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नर्मदा नदीवर बांधलेल्या सरदार सरोवर धरणाचे तेवीस दरवाजे आज, मंगळवारी (दि. १०) उघडण्यात आले. त्यातून सहा लाख २१ हजार क्युसेक इतका विसर्ग होत आहे. त्यामुळे गुजरात हद्दीतील नर्मदा काठच्या गावांना धोका वाढला आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर या धरणाची उंची १६३ मीटर इतकी आहे. मध्य प्रदेशात चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे या धरणातील जलसाठा दर काही तासाने वाढत आहे. आतापर्यंत धरणातील पाण्याची पातळी १३६.६८ मीटर पर्यंत गेली होती. म्हणून हे सर्व दरवाजे ३.९ मीटर उचलण्यात आले आहेत. नदीच्या पात्रामध्ये तसेच सोबत काढलेल्या कालव्यांमधून सुद्धा हजारो क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे लगतच्या शेतांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

मिळालेल्‍या माहितीनुसार कालव्यांमधून अठरा हजार एकवीस क्युसेक पाणी वाहत आहे. नर्मदेच्या महापुरामुळे सरदार सरोवर धरणात सहा लाख ५६ हजार ५६० क्‍युसेक तक्‍या पाण्याची आवक सातत्याने होत आहे. तथापी, धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी आज दुपारी तीन वाजण्या दरम्यान १३६.५० मीटर इतकी झाली. दरम्यान, पुराचा जोर असल्यामुळे नर्मदेवरील तावा आणि बरगी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्याचबरोबर इंदिरा गांधी धरणाचे बारा दरवाजे सुध्दा उघडण्यात आले. 

नर्मदेच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव लगतचा धरणग्रस्त भाग प्रभावीत झाला आहे. धरणाच्या फुगवठ्यातील पाण्यामुळे बाधित झालेल्या आठ ते दहा गावांमधील विस्थापित आदिवासींना सुरक्षीत ठिकाणी हलविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.