Fri, Apr 26, 2019 19:17होमपेज › Nashik › बँकांच्या संपामुळे नाशिकमध्ये 100 कोटींची उलाढाल ठप्प  

बँकांच्या संपामुळे नाशिकमध्ये 100 कोटींची उलाढाल ठप्प  

Published On: May 31 2018 1:43AM | Last Updated: May 30 2018 10:43PMनाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रीयीकृत बँकांच्या दोन दिवसीय देशव्यापी संपामध्ये नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1, 500 कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. या संपामुळे जिल्ह्यामध्ये दोन दिवसांत तब्बल 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली.  
वेतनवाढ कराराची अंमलबजावणी त्वरित करावी, अधिकारी-कर्मचार्‍यांच्या इतर सेवा शर्तीत योग्य ते सुधार घडवून आणावेत, पगारवाढीच्या करारात श्रेणी एक ते सात अशा अधिकार्‍यांचा समावेश करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील दहा लाख अधिकारी-कर्मचार्‍यांनी दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे. यात जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

महाराष्ट्र बँकेच्या 93 शाखा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 60, बँक ऑफ इंडियाच्या 38 तर युनियन बँक, आयडीबीआय, देना बँकेसह इतर बँकांच्या सुमारे 250 शाखा आहेत. या सर्व शाखांमधून दररोज 50 कोटींची उलाढाल होते.  दोन दिवस आर्थिक व्यवहार, चेक क्‍लिअरन्स न झाल्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला. बँका बंद असल्यामुळे एटीएम सेवा, इंटरनेट  बँकिंग सेवेचा ग्राहकांनी लाभ घेतला. 

राज्यात 40 लाख कोटींचे  व्यवहार ठप्प 

वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचार्‍यांच्या दोन दिवसीय संपाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देशभरात या संपाचा परिणाम दिसून आला आणि राज्यातच सुमारे 40 लाख कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. देशभरातील सुमारे 85 हजार शाखा बंद  असून, एटीएमदेखील कोरडे पडण्याची शक्यता आहे. भारतीय बँक महासंघातर्फे देण्यात आलेल्या दोन टक्के वेतनवाढीला कर्मचार्‍यांचा विरोध आहे.

देशातील 21 सार्वजनिक बँका, विभागीय बँका, खासगी क्षेत्रातील काही जुन्या बँका आणि सहा विदेशी बँकांतील एकूण 10 लाख कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. अधिकारी आणि शाखा व्यवस्थापकांचादेखील यात सहभाग असल्याने संपूर्ण बँकिंग व्यवस्था ठप्प झाली आहे. महिनाअखेर असल्याने पगारावर याचा परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रातील 60 हजार कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घेतला आहे. मुंबईतील सार्वजिनक क्षेत्रातील बँकांच्या बहुतेक शाखा बंद होत्या. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. संपातील सहभागी कर्मचार्‍यांनी पी.एम.रोड ते दक्षिण मुंबईतील फोर्टपर्यंत मोर्चाही काढला. सरकारी योजना राबवण्याची जबाबदारी बँक कर्मचार्‍यांवर असल्याने कामाचा ताण वाढला आहे. त्या तुलनेत आम्हाला वेतन कमी मिळते, असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे राज्यातील संघटक देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत बँकांचा व्यवसाय दुपटीने वाढला असून, प्रत्येक कर्मचार्‍यामागील व्यवसायही 27 कोटी रुपये इतका झाल्याची माहिती त्यांनी दिली.