Sun, May 26, 2019 12:49होमपेज › Nashik › काँक्रिटीकरणामुळे नदीपात्रातील जैवविविधता नष्ट

काँक्रिटीकरणामुळे नदीपात्रातील जैवविविधता नष्ट

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 10 2018 11:37PMपंचवटी : वार्ताहर 

नदीचे स्वतःचे असे हक्क आणि कर्तव्य आहेत. आपण तिच्या हक्कांवर आणि कर्तव्यांवर घाला घालीत आहोत. नदीपात्रातील काँक्रिटीकरणामुळे नदीची जैवविविधता नष्ट होत आहे. गोदेभोवती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच झाडे लावली पाहिजे. चुकीची झाडे लावल्यास नदीला अधिक धोका निर्माण होऊ शकतो. नदी ती झाडे स्वीकारत नाही, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासिका कीर्ती अमृतकर यांनी केले. वारसा व रिकनेक्टींग विथ गोदावरीतर्फे गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या रविवारी घेण्यात येणार्‍या गोदावरी परिक्रमेत सातवी परिक्रमा रविवारी (दि. 10) रोजी काढण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या परिक्रमेप्रसंगी रिकनेक्टींग विथ गोदावरीच्या शिल्पा डहाके, वारसाचे नीलेश गावंडे, अमोल पाध्ये, मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होते.

परिक्रमेच्या माध्यमातून गोदावरी नदीला समजून घेणे, तिच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावा. नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी किती गरज आहे. याबाबत जनजागृती निर्माण करता येईल. सध्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत नदीकाठावर तसेच पात्रात झाडे लावण्याचा विचार सुरू आहे. नदीभोवती कोणती झाडे लावावीत व कोठे लावावीत याबाबत अमृतकर यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, नदीच्या काठावर कोणती झाडे लावावीत याचे ठोकताळे ठरलेले आहेत. नदी भोवती जांभूळ, पानजांभुळ, वाळुंज, उंबर, करंज, कदंब, भोकर ही झाडे लावावीत. त्याचे पालन व्हायला हवे. गोदावरीच्या जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. गोदेच्या पर्यावरणाला वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवे.  शिल्पा डहाके यांनी परिक्रमेचे संचालन केले. नीलेश गावंडे यांनी प्रास्ताविक केले.