होमपेज › Nashik › थंडीने कांद्याला वाकड्या, मावाचा धोका

थंडीने कांद्याला वाकड्या, मावाचा धोका

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:29PM

बुकमार्क करा
नाशिक : सोमनाथ ताकवाले

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसातून वाचलेले कांदा रोपे नंतर लागवडीनंतर सध्या आकार धरण्याच्या स्थितीत आहे. तर नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांनी उशिरा कांदा रोपे तयार करून 15 दिवसांपूर्वी लागवड केलेल्या कांद्याच्या पातीवर अतिथंडी आणि ढगाळ वातावरणाने प्रभावित करण्यास सुरुवात केलेली आहे. कांदा पातीवर बुरशीजन्य वाकड्या आणि  मावा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये वाढत्या थंडी आणि ढगाळ वातावरणाची धास्ती आहे.

जिल्ह्यात थंडीचा पारा सुमारे 7 अंशांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे नाशिकला थंडीने हंगामातील नीचांकी आकडेवारी पार करून गारठून सोडले आहे. रब्बी पिकांना वाढलेली थंडी तारक असली तरी, कांदा-द्राक्षांना वाढलेली थंडी मारक ठरण्याची स्थिती आहे. थंडीबरोबर जिल्ह्यात ढगाळ वातारवरण असल्याने कांदा पिकावर मावा आणि वाकड्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली आहे. कांदापात या दोन्ही रोगाने बाधित होत असल्याने जो कांदा आता आकार घेण्याच्या स्थितीत आहे, त्याच्या पोषणावर वाकड्याने विपरीत परिणाम होणार आहे.

त्याचबरोबर उशिराने लागवड झालेल्या कांद्याच्या पातीवर माव्याने हल्ला चढवला तर त्याची वाढ खुंटण्याची सुरुवात होणार आहे. मावा कांदापातीच्या गाभ्यात वाढून तेथून पोषक रस शोषण करून प्रकाशसंश्‍लेषण आणि अन्ननिर्मिती प्रक्रियेत बाधा आणण्याचा अडथळा ठरत आहे. कांद्यावर पुन्हा नैसर्गिक संकटाची टांगती तलवार लोंबकळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.

थंडीतील चढ-उतार कांदापातीला मानवणारे ठरत नाही. त्याचबरोबर दिवसा उन्हचा चटका आणि सध्याकाळी, रात्री आणि सकाळी कडाक्याची थंडी कांद्याच्या पोषणाला घातक ठरत आहे. नाशिकमध्ये काल(दि.10) तापमान साडेआठ अंशांवर होते. ते आज दोन अशाने वाढून साडेदहा अंशांवर पोहोचलेले होते. दुपारीही थंडीचे अस्तित्व होते.