होमपेज › Nashik › सुरगाणा, नांदगावच्या तुलनेत इगतपुरी सरस

सुरगाणा, नांदगावच्या तुलनेत इगतपुरी सरस

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 11:55PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी इगतपुरी तालुका आढावा बैठकीत कुपोषणासंदर्भात परीक्षाच घेतली. प्रशिक्षण, ग्रामबाल विकास केंद्रात दिला जाणारा आहार तसेच आरोग्य संहितेबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना अधिकारी-कर्मचार्‍यांनी समाधानकारक उत्तरे दिल्याने गिते यांनीही समाधान व्यक्‍त केले. नांदगाव आणि सुरगाणा तालुक्यांच्या तुलनेत इगतपुरी तालुक्यातील बैठक फलदायी ठरल्याचे यावेळी दिसून आले.

वाडीवर्‍हे येथील मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या  बैठकीत सुरुवातीलाच ग्रामबाल विकास केंद्र, तालुकास्तरीय प्रशिक्षण, आरोग्य व आहारसंहिता याबाबत डॉ. गिते यांनी आढावा घेतला. ग्रामबाल विकास केंद्रांतर्गत कोणता आहार द्यावा, त्याची मात्रा किती असावी, कोणता आहार कधी द्यावा, कोणते औषध द्यावे याबाबत संबंधितांकडून माहिती घेतली. आहार व आरोग्यसंहिता याबाबत प्रत्येक ग्रामबाल विकास केंद्रात माहितीदर्शक फलक लावण्याचे निर्देश दिले. ग्रामसेवकांनाही याबाबत प्रशिक्षण देण्याचे निर्देश गिते यांनी दिले. कुपोषण हा जिल्हा परिषदेचा अतिशय गंभीर प्रश्‍न असून, प्रत्येकाने जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी योगदान देण्याचे तसेच स्वयंम योजना इगतपुरी तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. या योजनेंतर्गत आदिवासी भागातील लाभधारकांना कोंबड्यांचे वाटप करण्यात येणार असून, त्यापासून मिळणारी अंडी कुपोषित बालकांच्या आहारासाठी उपयुक्त ठरणार आहेत. यासाठी लाभधारकांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. 

महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी आहार संहितेबाबत माहिती देताना 1 जून अगोदर सर्वांना आमलेजयुक्त पीठ तयार करण्याच्या सूचना दिल्या.  जिल्ह्यात बालविकास केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी ग्रामसेवकांनी ग्रामविकास आराखड्यातील 10 टक्के रक्कम अंगणवाडीच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देशही दिले. सुरुवातीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. आयुष्यमान भारत योजनेचा प्राथमिक आरोग्य केंद्रानुसार आढावा घेण्यात आला. पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  प्रतिभा संगमनेरे यांनी दूषित पाणी नमुने, टीसीएल तपासणी, नादुरुस्त शौचालयांचा आढावा घेतला.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी पाणीपुरवठा योजनाचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजना विहीत वेळेत पूर्ण करण्याचे तसेच दप्तर हस्तांतर न करणार्‍या ग्रामसेवकांवर कारवाई केली जाईल असे  गिते यांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, पाणीपुरवठा योजना,  जनसुविधेची कामे, घरकुल आदी योजनांची अपूर्ण बांधकामे  मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी संबंधिताना देण्यात आले. सर्व विभागांचा एकमेकांशी समन्वय असावा व समन्वयाने सर्व विकासकामे करावीत हा आढावा बैठकीचा उद्देश असल्याचे सांगत इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त करून डॉ. गिते यांनी गटविकास अधिकारी किरण जाधव व सर्व खातेप्रमुख व कर्मचार्‍यांचे कौतुक केले.