Fri, Jul 19, 2019 07:22होमपेज › Nashik › नाशिकमध्ये उसळला भीमसागर

नाशिकमध्ये उसळला भीमसागर

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 14 2018 11:36PMद्वारका : वार्ताहर  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा जिवंत देखावा, चित्ररथ, भीमा- कोरेगाव विजयस्तंभ, भगवान गौतम बुद्ध यांची आकर्षक मूर्ती, अतिक्रमण निर्मूलन, अन्याय-अत्याचार आदी विषयांवर प्रबोधनपर देखावे यांच्यासह डीजे आणि ढोल-ताशांचा दणदणाट, भीमगीतांच्या तालावर वाजत-गाजत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. 

महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आ. देवयानी फरांदे, पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आदींच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता जुने नाशिक परिसरातील वडाळा नाका येथील मोठा राजवाडा परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात झाली. 

निळाईत न्हाऊन निघाले नाशिक

द्वारका : वार्ताहर 

निळे झेंडे, निळे फेटे, निळ्या रंगांची विद्युत रोषणाई आणि निळीची उधळण अशा निळ्या वातावरणात नाशिक शहर न्हाऊन निघाले. निमित्त होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे. 

जिवंत देखावे, आकर्षक चित्ररथ, भीमा- कोरेगाव विजयस्तंभ, अन्याय-अत्याचार आदी विषयांवरील प्रबोधनपर देखावे, जय भीमचा जयजयकार, डीजे आणि ढोल-ताशांचा दणदणाट आणि भीमगीतांच्या तालावर वाजत-गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आ. देवयानी फरांदे, पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आदींच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता जुने नाशिक परिसरातील वडाळा नाका येथील मोठा राजवाडा परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात झाली. 

मिरवणुकीत आ. जयंत जाधव, पोलीस उपायुक्‍त लक्ष्मीकांत पाटील, पश्‍चिम सभापती डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका शोभा साबळे, नगरसेवक गजानन शेलार आदी मान्यवर सहभागी झाले होते. याप्रसंगी सुलोचना आहेर यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

16 मंडळांचे चित्ररथ

मिरवणुकीत 20 मंडळांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 मंडळांचे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. मोठा राजवाडा, चौक मंडई, फाळके रोड, दूधबाजार, शालिमार, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल,  नेहरू गार्डनमार्गे शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. 

मिरवणुकीत अनेक मंडळांनी देखाव्यांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त तैनात केला होता. तसेच मिरवणुकीच्या सुरुवातीला ध्वनिप्रदूषणाची तीव्रताही तपासली. ज्या मंडळांकडून ध्वनिप्रदूषणाच्या तीव्रतेची मर्यादा ओलांडली जाईल, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला होता. मिरवणूक मार्गात विविध मंडळं, संघटनांनी व्यासपीठ उभारून चित्ररथांचे स्वागत केले. मिरवणुकीत आबालवृद्धांसह, बालक आणि महिलावर्गानेही सहभाग घेतला होता.