Wed, Mar 20, 2019 12:44होमपेज › Nashik › डॉ. आंबेडकरांचे रेखाचित्र गिनीज बुकमध्ये !

डॉ. आंबेडकरांचे रेखाचित्र गिनीज बुकमध्ये !

Published On: Jan 03 2018 1:15AM | Last Updated: Jan 02 2018 11:37PM

बुकमार्क करा
म्हसरुळ : सुधीर पेठकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सर्वांना माहिती व्हावी, या उद्देशाने गेल्या वर्षी नाशिकमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या सात फूट उंच व तब्बल 900 फूट लांबीच्या पेन्सिल रेखाचित्राची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हे रेखाचित्र साकारणार्‍या अशोक नागपुरे व त्यांच्या 54 सहकार्‍यांच्या कलेची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आल्यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

नाशिकमधील म्हसरूळ येथील अभिषेक हॉलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गिनीज बुकतर्फे या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, ज्येष्ठ पत्रकार सौमित्र दास, पुणे येथील उपजिल्हाधिकारी सुनील गाडेकर, किरण चांदेकर, अनंत चांदेकर उपस्थित होते. रेखाटन ट्रस्ट व नागपुरे यांनी 11 महिने मेहनत घेत रेखाचित्रे साकारले होते. या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. हे  रेखाचित्र साकारण्यात सहभागी झालेल्या 54 सभासदांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.
उलगडला बाबासाहेबांचा जीवनपट

जगातील सर्वात मोठे व विविध कलाकारांनी मिळून केलेले हे पेन्सिल रेखाटन ठरले. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचा जीवनपट चित्र स्वरुपात रेखाटला गेला असून, त्यांच्या आयुष्यातील निवडक 77 प्रसंग यात आहेत. सात फूट उंच व 900 फूट लांबीचे कॅनव्हॉस फ्रान्सहून तर पेन्सिल ऑस्ट्रियाहून मागविण्यात आल्या होत्या. त्यावर स्थानिक हौशी 27 चित्रकारांनी चित्रे काढली.  विशेष म्हणजे हे सर्व जण विविध व्यवसायातील आहेत. तसेच नागपुरे यांचे 12 वर्षांपासूनचे विद्यार्थीही आहेत. यातील चित्रे निवडताना इंटरनेटचा चांगला उपयोग झाला. आव्हान होते ते डॉ. आंबेडकर परदेशात शिक्षणाला जाईपर्यंतचे. म्हणजे 1913 पर्यंतची कुठलीही छायाचित्रे उपलब्ध नव्हती. ती अंदाज बांधून रेखाटावी लागली. त्यात अशा 10 चित्रांचा समावेश आहे.


11 महिन्यांच्या मेहनतीनंतर पूर्ण झालेले रेखाचित्र 14 एप्रिल 2016 रोजी नाशिकमध्ये आयोजित प्रदर्शनात मांडण्यात आले होते.