Fri, Jul 19, 2019 22:00होमपेज › Nashik › आयुक्‍तांचा कर्मचार्‍यांवर भरोसा नाय का!

आयुक्‍तांचा कर्मचार्‍यांवर भरोसा नाय का!

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 29 2018 11:37PMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त पंधरा दिवसांच्या सुट्टीवर गेल्याने त्यांचा कार्यभार ज्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आला ते जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हे देखील चार दिवसांच्या रजेवर निघून गेले आहेत. यामुळे या दोन्ही वरिष्ठांनी मनपाचा कारभार इतर कुणाच्या तरी खांद्यावर टाकणे अपेक्षित असताना त्यांनी मात्र आपला कुणावरही भरोसा नाही, असे दर्शविले आहे. मनपा आयुक्‍तांच्या या वर्तनामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये तर्कवितर्क लढविले जात असून, मनपात इतर कोणीही कारभार सांभाळण्याच्या लायक नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था म्हटली की, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे या संस्थेची दोन चाके. परंतु, या दोन्ही चाकांचे मार्ग सध्या वेगवेगळे झाल्याने महापालिका सैरभैर झाली आहे. त्यातही प्रशासनाकडून सध्या मनपातील लोकप्रतिनिधींना दुय्यम वागणूक मिळत असल्याने नगरसेवक आणि पदाधिकारीही या ‘हम करे सो’ कायद्याला वैतागले आहेत. आता पदाधिकारी आणि नगरसेवकांची अशी अवस्था असेल तर प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे तर हाल विचारायलाच नको. दररोज कोणत्या ना कोणत्या कर्मचारी अधिकार्‍यांवर कारवाई होत असल्याने कर्मचारी भयभीत झाले आहेत. त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे सहायक अभियंता रवींद्र पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून कुणाही कर्मचारी व अधिकार्‍यावर भरोसा नसल्यानेच गेल्या चार ते पाच दिवसांत मनपातील जवळपास 50 अभियंत्यांची खांदेपालट करून सर्वांनाच धक्के दिले. नगररचना विभाग तर पूर्णपणे खालीच करून टाकला.

ही कार्यवाही झाल्यानंतर आयुक्‍त तुकाराम मुंढे गेल्या सोमवारपासून (दि.28) पंधरा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. त्यांचा कार्यभार त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांच्याकडे सोपविला. यामुळे या पंधरा दिवसांत जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मनपाचा कारभार चालेल, असे बोलले जात असतानाच जिल्हाधिकारी मंगळवारपासून (दि.29) चार दिवसांच्या रजेवर निघून गेले आहेत. या दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या रजेच्या कालावधीत खरे तर इतर दोन अतिरिक्‍त आयुक्‍तांकडे रितसर जबाबदारी देणे गरजेचे होते. परंतु, अशी कोणतीही प्रक्रिया न करताच महापालिकेचा कारभार सुरू आहे. आधीच मनपातील वातावरण कलुषित झालेले असताना आयुक्‍तांच्या अनुपस्थितीत नसती उठाठेव कोण करून घेईल, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात काही अधिकार्‍यांशी चर्चा केली असता आहे तेच ठिक आहे. उगाच कोण डोक्याचा शीण वाढवून घेईल, असे सांगत आपल्या भावना व्यक्‍त केल्या.