होमपेज › Nashik › स्वावलंबन काडार्र्पासून दिव्यांग अद्याप वंचित

स्वावलंबन काडार्र्पासून दिव्यांग अद्याप वंचित

Published On: May 17 2018 1:26AM | Last Updated: May 16 2018 11:49PMनाशिक : प्रतिनिधी

दिव्यांग व्यक्तींची स्वतंत्र ओळख व्हावी, त्यास सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ओळखपत्रावर मिळावा यासाठी स्वावलंबन कार्ड ऑनलाइन काढण्यास सांगितले आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या संथ कारभारामुळे दिव्यांग व्यक्ती स्वावलंबन कार्डपासून वंचित असल्याचा आरोप प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने केला आहे. यासंदर्भात प्रहारच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी (दि.16) जिल्हा रुग्णालयात आंदोलन करून प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांना निवेदन दिले. 

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रत्येक बुधवार आणि शुक्रवारी दिव्यांग व्यक्तींसाठी ऑनलाइनरीत्या अपंग प्रमाणपत्र वितरित केले जात असते. मात्र, रुग्णालयाच्या संथ कारभारामुळे दिव्यांग व्यक्तींना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती स्वावलंबन कार्डपासून वंचित असून, त्यांना इतर शासकीय योजनांचा लाभही मिळत नाही. याची दखल घेत रुग्णालयीन प्रशासनाने बदल करून तातडीने स्वावलंबन कार्ड देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे जुने कार्ड आहे तुम्हाला ऑनलाइन कार्डची गरज नाही असे सांगत दिव्यांगांना परत पाठवले जात आहे. मात्र, ऑनलाइन कार्ड बंधनकारक असल्याने ते देण्यात यावे. दिव्यांग व्यक्तींनी त्यांचे ओळखपत्र दाखवल्यास त्यांना प्रमाणपत्र द्यावे, रुग्णालयात केसपेपर काढण्यासाठी स्वतंत्र टेबल द्यावा, ज्या दिवशी प्रमाणपत्रासाठी बोलवाल त्याच दिवशी प्रमाणपत्र वितरित करावे, कर्मचार्‍यांना दिव्यांग व्यक्तींसोबत सौजन्याने वागण्याची समज द्यावी, अशा मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर सचिन पानमंद, दत्तू बोडके, अनिल भडांगे, बबलू मिर्झा, रवींद्र टिळे, संतोष मानकर, प्रकाश जाधव आदींच्या स्वाक्षर्‍या होत्या.